कोरोना सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची खडवली भातसा नदीवर गर्दी
शासनाच्या जमावबंदी आदेशाची पायमल्ली
टिटवाळा : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. या संसर्गामुळे गेली पंधरा दिवसापासून महाराष्ट्रातील जनजिवन देखील विस्कलीत झाले आहे. राज्य शासन या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. शासकीय यंत्रणा लोकांना बाहेर न पडने व जमावबंदीचे आदेश देखील पारीत केले आहे. असे असताना देखील कोरोनामुळे मिळालेल्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची खडवली भातसा नदीवर शुक्रवारी कमालीची गर्दी दिसून आली. या बाबीकडे स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने आपले लक्ष केंद्रित करावे असे येथील स्थानिक नागरिकांतून बोलले जाते. कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवून ठेवला आहे. आपल्या देशात देखील कोरोनाची लागण झालेली आहे. महाराष्ट्र राज्यात याचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र सरकार यावर प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाय योजना राबवताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसंह संपूर्ण शासकीय यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे. अनेक आवाहने केली जात आहेत. कारण नसतांना लोकांनी घराबाहेर पडू नका, जमावाने एकत्र येऊ नका, सर्व शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, जत्रा, आठवडा बाजार, पर्यटन स्थळे व इतर जमावाचे कार्यक्रम बंद ठेवण्याचे आवाहनही जनतेला करण्यात आले आहेत. असे असताना देखील खडवली येथील भातसा नदीवरील पर्यटन स्थळावर शुक्रवारी कोरोनामुळे मिळालेल्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी दिसून आली.