महाजने गावच्या तरुणांचे विधायक पाऊल...
धार्मिक कार्यक्रमाचा खर्च टाळून गावकऱ्यांसाठी उभा केला ५ लाख रुपयांचा वैद्यकीय निधी
पाली : देशात कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. अशा वेळी सामाजिक बांधिलकी व समाजभान ठेवत अलिबाग तालुक्यातील महाजने गावच्या तरुणांनी विधायक काम केले. धार्मिक कार्यक्रमावरचा खर्च टाळून गावच्या लोकांसाठी ५ लाख रुपयांचा वैद्यकीय निधी संकलित केला आहे. यातील पहिला ५१ हजारांचा निधी गावकऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. ग्रामस्थांना आवश्यकते नुसार हा ५ लाखांचा संकलित निधीचा दिला जाणार आहे. महाजने गावामध्ये आईमहाजनाई व महामारी या देवींच्या पालखीचा सोहळा नुकताच पार पडला. कोव्हीट १९ रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील ग्रामस्थांना अचानक येणाऱ्या आजाराची जाणीव नसते व त्याचवेळी हॉस्पिटलचा खर्च करण्यासाठी पैसेच नसल्यामुळे खूप मोठया आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. पैश्याअभावी काहीजण हॉस्पिटलमध्येही न जाण्याचा निर्णय घेतात. या सर्व ग्रामस्थांसाठी वैद्यकीय मदत म्हणून महाजने गावातील मुंबईत नोकरी करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनी ५ लाख रुपयांचा निधी बिनव्याजी उपलब्ध करून दिला आहे. त्या पैकी ५१००० रुपयांचा निधी महाजनाई देवीच्या उत्सवानिमित्ताने ग्रामस्थांकडे दिला आहे
चाकोरी बाहेरचा रस्ता
मार्च २००६ मध्ये महाजने गावातील मुंबई मंडळाने चाकोरीबाहेर रस्ता निवडून काही धाडसी निर्णय घेतले व महाजने गाव स्वावलंबी कसे होईल या दृष्टीने वाटचाल करायला सुरुवात केली. सुरुवातीला श्री महाजनाई व महामारी पालखीच्या निमित्ताने काही शेकड्यात वर्गणी जमा होत होती व जमा होणाऱ्या वर्गणीतून गावात लोकोपयोगी वस्तू आईच्या चरणी अर्पण करायला सुरुवात केली. १४ वर्षाच्या कालखंडात मंडळाने बऱ्याच लोकोपयोगी वस्तू गावास भेट देत गावातील लोकांना गरजेच्या वस्तू आपल्याच गावात उपलब्ध करून दिल्या. काही शेकडो रुपयांत होणारी उलाढाल १४ वर्षात काही लाखांच्या घरात होऊ लागली. २०२० साल महाजने गावातील लोकांसाठी काही विशेष महत्वाचे ठरले. याच वर्षात श्री महाजनाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. व या वर्षी मुंबई मंडळाने महाजने गावातील ग्रामस्थांसाठी, अंदाजे पाच लाख रुपये महाजने गावाचा हक्काचा वैद्यकीय निधी म्हणून जमा करण्याचा निर्धार करण्यात आला. त्या निधीचा पहिला हप्ता एकावन्न हजार रुपये पालखीच्या दिवशी ग्रामस्थांना देण्यात आला.
निस्वार्थी वृत्ती
सदर निधी महाजने गावातील ग्रामस्थांसाठी विणाव्याज आहे. विशेष बाब म्हणजे मंडळाला कोणीही अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा खजिनदार नाही. सर्व सभासद निस्वार्थी वृत्तीने मंडळाचे काम करतात. मातृसत्ताक संस्कृतीचे दर्शन महाजने गावच्या ग्रामस्थांनी घडवून दिल्याची चर्चाही परिसरातील गावामध्ये आहे. आगरी कोळी समाजामध्ये चैत्र महिन्यात देवांच्या पालखीची खूप मोठी परंपरा आहे, या मध्ये लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र महाजने गावाच्या ग्रामस्थांचा हा धार्मिक विधी वर खर्च करता न समाजाच्या उन्नतीसाठी नवा आदर्श आहे. त्यामुळे महाजने गावच्या ग्रामस्थांचा आदर्श सगळ्याच समाजातील लोकांनी घेतला पाहिजे असे बोलले जात आहे. मातृसत्ताक संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न आहे. धार्मिक उत्सव व सणांवर होणार खर्च अशा प्रकारे गावाच्या कल्याणासाठी देणे ही खूप विधायक बाब आहे. आगररी-कोळी समाज नेहमी देण्याची भूमिका घेतो. - ऍड. राकेश पाटील, ग्रामस्थ