भिवंडीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंता! पालिका कर्मचाऱ्यांची सरक्षितता धोक्यात!

भिवंडी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार आता भारतात होऊ लागला आहे. रोजच एक हजाराने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हि संख्या आता वीस हजारापेक्षा जास्त झाली आहे. त्यातच महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्हा आघाडीवर आहे. मुंबई पासून जवळच असलेल्या भिवंडी शहरात १२ एप्रिल रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. आणि अवघ्या १० दिवसात हाच आकडा ही पोस्ट लिहित असेपर्यंत १२ वर गेला असून उद्यापर्यंत हाच आकडा दुप्पट होण्याची भिती निर्माण झाली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना भिवंडी शहर एकदम ठसेफ झोनठ मध्ये होते. भिवंडी ऐतिहासिक रेकॉर्ड करण्याच्या तयारीत असतांनाच १२ एप्रिल रोजी एक रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ माजण्याबरोबरच नाराजीही पसरली. मात्र, नागरिकांचा निष्काळजीपणा नडल्याने शहरात हीच संख्या १० दिवसात १२ ने वाढली. शासकीय यंत्रणापोलिसांनी आवाहन करुन सुध्दा लोकं लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर, बाजारात, मार्केटमध्ये मोकाट फिरत आहेत. घरात बसायला आणि कोरोनाला गांभीर्याने घ्यायलाच कोणी तयार नाही. जिकडेतिकडे गर्दी आणि गर्दीच दिसत आहे. न्यूज चॅनेलने बातम्या दाखवूनही लोकांवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. आणि पालिका प्रशासनही ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाही. एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना जीवाची बाजू लावून कर्तव्यावर हजर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितताच धोक्यात आलेली आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे या कर्मचाऱ्यांना कोणतेही सुरक्षा साहित्य मिळाले नाही. गल्ली बोळात, वस्तीत, मोहल्यात, घाणीमध्ये काम करावे लागत असल्यामुळे विषाणूचा सर्वात जास्त धोका या सफाई कर्मचाऱ्यांनाच आहे. मात्र, कामगार संघटनांनी मागणी करूनही पालिका प्रशासन झोपेचे सोंग घेऊन आहे. टाटा आमंत्रा येथे विलिगिकरण कक्षात ठेवलेल्या संशयित कोरोना रुग्णांचे रुम साफ करण्यासाठी पालिका प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहे. मात्र, फक्त साधे मास्क आणि ग्लोज घालून सफाई कर्मचाऱ्यांचा बचाव होईल का? असे प्रश्न विचारले जात आहे. पण, आयुक्त, उपायुक्त वातानुकूलित कार्यालयात बसून कागदी आदेश सोडून कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय धस्तावलेले आहेत. मरणाच्या भितीने कर्मचाऱ्यांनी काम बंद केले तर सार्वजनिक आरोग्यच धोक्यात येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...