वाढदिवसाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहायता निधीस : चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक
मुरबाड : संपूर्ण राज्यात कोरोना या महाभयंकर संकटाने थैमान घातले आहे. गरीब ,मजूर ,हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत .अशा वेळी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करणे हे मनाला न पटन्यासारखे आहे.हा विचार डोक्यात ठेवून आपल्या चौदाव्या वाढदिवसासाठी जमविलेली २५०००/ हजारांची रक्कम मुरबाडच्या एका चिमुकल्याने थेट मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. मुरबाड शहरातील हनुमान आळी येथे राहणाऱ्या सजल साईनाथ शिंदे याचा आज चौदावा वाढदिवस आहे . एरवी आपल्या कुटुंबा समवेत थाटामाटात वाढदिवस साजरा करणाऱ्या या चिमुकल्याने यंदा तो साजरा न करता त्यासाठी खर्च होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्याची इच्छा आपल्या आईवडीलांसमोर व्यक्त केली. आपल्या इवल्याशा बालकाची सामाजिक जाण पाहून त्याच्या आईवडीलांसह शेजारपाजायांनी या निर्णयाचे कौतुक केले. आज सकाळी मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांच्याकडे पंचवीस हजारांचा धनादेश वडील साईनाथ शिंदे व काका मयर शिंदे यांच्या उपस्थित मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करून सुजलने एका सामाजिक वाढदिवसाचा जगावेगळा आनंद अनुभवला असल्याचे सांगितले. लहानवयात सुजलच्या या सामजिक जाणिवेने अनेक धनदांडग्यांना चांगलीच चपराक मारली आहे. तर हा संदेश अनेकांपर्यंत पोहचविला जावा, जेणेकरून राज्यातील, देशातील कोरोना विरुद्धच्या लढाईला यशप्राप्तीसाठी मदतीचे अनेक हात पुढे सरसावले जातील अशी प्रतिक्रिया सामाजिक स्तरावरून व्यक्त केली आहे. सुजलने दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे तहसीलदार अमोल कदम यांच्यासह सर्व स्तरावरून त्याच्यावर शभेच्छांचा वर्षाव व त्याचे कौतुक केले जात आहे.