शंभर बाटल्या रक्त जमा रक्तदानाला चांगला प्रतिसाद
बदलापूर : संवेग फाऊंडेशन या सामाजिकसंघटनेच्या पुढाकाराने आणि मुंबई येथील सेंट जॉर्ज रूग्णालय यांच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शंभर बाटल्या रक्त जमा करण्यात आले. बदलापूर पश्चिमेतील पाटील मंगल कार्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरात रक्ताचा असलेला तुटवडा आणि सुरु असलेली संचार बंदी यामुळे विविध आजारांच्या रूग्णांना रक्ताची गरज अधिक लागत असल्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. संवेग फाऊंडेशनच्या सदस्यांनी केलेल्या आवाहनानंतर बदलापरकरांनी उत्स्पर्तपणे रक्तदानासाठी नोंदणी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर राखत प्रत्येक तासाला २५ अशा रक्तदात्यांना ११ ते ३ या वेळेत बोलवण्यात येत होते. त्यानुसार १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. अतिशय कमी वेळेत रक्तदात्यांनी दिलेला प्रतिसादाबाबत आयोजक संवेग फाऊंडेशनचे प्रमुख श्रीधर पाटील यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.