कोरोनाला रोखणार....पण कसे
__टाळेबंदीच्या संदर्भात केंद्राकडून जारी केलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना परवानगी देण्यात आली आहे, असे स्पष्ट केले. त्याच वेळी रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रम हे यापुढेही बंद राहणार आहेत, याची पुन्हा आठवण करून दिली. या मार्गदर्शक नियमावलीनुसार, ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसायव्यापारी आस्थापनांना करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात आली आहेत्यामुळे, त्याचे कोठेही उल्लंघन होत असेल, तर ते लगेच प्रशासनाच्या आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांच्या लक्षात आणून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनते. ते काटेकोर पाळले पाहिजे, परंतु ते करण्यासाठी नागरिकांनी आपले घरी राहण्याचे मूळ कर्तव्य विसरून अत्यावश्यक उद्योगव्यवसायांना सूट मिळाली म्हणून टेहळणीस बाहेर पडण्याच्या अनुचित सवयीला आवर घातला पाहिजे. तसा ते घालतील, या भरवशावर हा टप्पा सुरू होत आहे. करोनाचा भारतात जानेवारीअखेर प्रवेश झाल्यानंतर केवळ अडीच महिन्यांत या विषाणूने आपले भयावह रूप दाखवून दिले. देशातील करोनाग्रस्तांचा आकडा रविवारी १५ हजारांची सीमा ओलांडून जात असतानाच मृतांचा आकडा ५२० च्या वर गेला होता. देशातील कोणत्याही भागापेक्षा महाराष्ट्र राज्य आणि विशेषत: राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई सर्वाधिक बाधित आहे. महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून, मृतांचा आकडाही देशात सर्वाधिक आहे आणि तो तसाच राहणार, हे दिसतेच आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई हे देशातील करोनाशी लढणाऱ्या आघाड्या बनल्या आहेत. अशा वेळी महाराष्ट्र इतरांच्या तुलनेत अधिक जोखीम पेलत आहे, हे उघडच आहेएका बाजूला या साथीशी लढा द्यायचा आहे आणि दुसरीकडे या लढ्यासाठी लागणारी वैद्यकीय सामग्री आणि आर्थिक कुमक केंद्राकडून मिळवण्याचा संघर्ष आहे. देशातील एकंदर करोनाग्रस्तांपैकी २५ टक्के रुग्ण महाराष्ट्रात असल्याने देशाची करोनाविरुद्धची आघाडी या राज्यात उघडली गेली आहे. अशा वेळी केंद्र सरकारने सढळ हाताने आणि अभूतपूर्व कौशल्याने राज्याला बळ देण्याची गरज आहे.