डे-नाईट कर्तव्य बजावणाया पोलिसांवर फुलांचा वर्षाव : नागरिकांनी ठोकले सॅल्युट
उल्हासनगर उन्हातान्हाची पर्वा न करता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी डे-नाईट रोडवर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर दोन फाऊंडेशनच्या पुढाकाराने फुलांचा वर्षाव करण्यात आला असून नागरिकांनी रक्षकांना सन्मानाने सॅल्युट ठोकून त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती दिली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही परिसर हे संवेदनशील आहेत.लॉक डाऊनमध्ये या परिसरात शांतता प्रस्थापित करतानाच, बाजारपेठा तसेच हद्दीतील सर्व प्रमुख रोडवर डे-नाईट पहारा देऊन दुचाकीस्वारांना भावनिक आव्हान करून त्यांना परत माघारी पाठवणाऱ्या आणि आवाहन करूनही प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्या शेकडोंच्या संख्येने दुचाक्या जप्त करून विठ्ठलवाडी पोलिसांनी हद्दीतील परिस्थिती कमालीची नियंत्रणात आणलेली आहे. डे-नाईट कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांच्या या कार्याचे जाहीर कौतुक करण्यासाठी हिराली फाऊंडेशनचे ऍड. पुरुषोत्तम खानचंदानी, सरिता खानचंदानी, सिटीजन फाऊंडेशनचे प्रदिप कपूर, मुकेश शेवानी यांच्या पुढाकाराने सहाय्यक पोलीस आयुक्त डी.डी. टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार खिडकीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल सोनवणे, सोनम पाटील,उपनिरीक्षक हर्षल राजपूत, सचिन साळवे, के.बी. साळवे, आर.आर. पाटील, तसेच राहुल काळे, जितेंद्र चित्ते, पथवे, जाणू नेटके, सुनील रसाळ आदींवर फुलांचा वर्षाव केला. हे सुखावून सोडणारे चित्र बघून नागरिकांनीही पोलिसांना सन्मानाने सॅल्युट ठोकला.