...तिच्यासाठी वनअधिकारी ठरले देवदूत
शहापूर : किन्हवली परीसरातील बर्डेपाडा हद्दीत शेतमाळावर मुक्कामी असलेल्या धनगर वस्तीत शेळ्या मेंढ्यांच्या कळपातील छोट्या कोकरांसोबत खेळत असलेल्या अनुष्कावर भर दुपारी रानडुक्कराने हल्ला करून तिच्या मांडीचे लचके उपटले.तिचे पालक मदतीसाठी याचना करत होते.लॉकडाऊन मुळे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते,अती रक्तस्त्रावाने ती अर्धमेली होऊन पडली असतानाच शहापूर वन विभागाचे किन्हवली-चिखलगाव येथील वनपाल विकास लेंडे व वनरक्षक चिंतामण निंबाळकर यांनी शासकीय गाडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेऊन तिचे प्राण वाचविले.तिच्यासाठी देवदूत ठरलेल्या त्या वनाधिकार्याचे मात्र कौतुक होत आहे. किन्हवली परीसरातील बर्डपाडा हद्दीत एका शेतात सुमारे विस दिवसांपासून एक धनगराचे कुटुंब आपल्या शेळ्या, मेंढ्यांसह वस्ती करून राहता आहेत. जुन्नर(ता.पुणे) येथून आलेल्या या कुटुंबासोबत त्यांची पुतणी कु.अनुष्का ठोंबरे (वय ७) हि सुद्धा राहते. मंगळवारी (दि.१४) दुपारी१२ वाजता ती आपल्या शेळ्यांच्या कळपातील छोट्या छोट्या कोकरांसोबत खेळत होती. ईतक्यात समोरच्या झुडपांतून एक रानडुक्कर सुसाट धावत आले व अनुष्कावर हल्ला करत डाव्या मांडीचा लचका उपटला.उन्हाचा भर असल्याने तिच्या जखमेतून खूप रक्तस्राव होत होता. धनगर कुटुंब तिच्या मदतीसाठी याचना करत होते, सध्या लॉकडाऊन असल्याने संचारबंदी आहे, अशा परिस्थितीत रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते.ईतक्यात कर्तव्यावर असलेल्या वनपाल विकास लेंडे, वनरक्षक चिंतामण निंबाळकर यांना हि घटना कळताच त्यांनी गस्तीच्या शासकीय गाडीतून तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले, पण दुर्दैवाने किन्हवली आरोग्य केंद्रात व शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात रेबिजची लस शिल्लक नसल्याने वनपाल लेंडे यांनी तिला तातडीने ठाणे- कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. ताबडतोब उपचार सुरू झाल्याने अनुष्काच्या प्रकृतीत सुधारणा झाली व तिला आज(दि.१६)रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला."रानडुक्कराच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या अनुष्काच्या कुटुंबाला धसई वनपरिक्षेत्र अधिकारी एस सी तोरडमल यांनी भेट घेत पाच हजार रुपयांची तातडीची रोख मदत दिली.शासनाकडून तिला आणखी भरीव मदत मिळावी म्हणून प्रस्ताव सादर केला आहे."संचारबंदीच्या अशा अवघड प्रसंगी अनुष्कासाठी देवदूत ठरलेल्या या वन अधिकार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.