अडकून पडलेल्या परप्रांतिय कामगारांना मिळते रोज जेवण अंबरनाथला उद्योजक आणि फणशिपाडा ग्रामस्थांचा पुढाकार
अंबरनाथ : हाताला काम नाही, जेवायला अन्न मिळेना अश्या विचित्र स्थितीमध्ये मिळेल त्या मार्गाने आपल्या गावाकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या सगळीकडे पहाण्यास मिळते, पण अंबरनाथला मात्र कंपन्या बंद असल्या तरी लॉकडाउनच्या परिस्थितीत अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील वास्तव्याला असणारा एकही परप्रांतीय कामगार उपाशी राहू नये यासाठी उद्योजकांसह फणशीपाडा ग्रामस्थांनी यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कामगारांना रोज दुपारचे जेवण देण्यात येत आहे. लॉकडाऊन परिस्थितीमुळे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमध्येही उद्योग- व्यवसाय ठप्प झाले आहेत, त्यामुळे परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत, या अडकून पडलेल्या कामगारांना रोज जेवण मिळावे यासाठी उद्योजक, राजकारणी आणि व्यावसायिक तसेच ग्रामस्थ धावून आले आहेत. आमदार डॉ. बालाजी किणीकर, आनंदनगर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आमा), अध्यक्ष उमेश तायडे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, गुणवंत खिरोदिया, विजयन नायर, त्याचप्रमाणे ग्रामस्थ नारायण मिसाळ, यशवंत मिसाळ, संजय मिसाळ, किशोर सांबारे, सुखदेव सांबारे, धोंडू दुर्गे, अनिल भोईर आणि त्यांचे सहकारी यांच्यासह अडकून पडलेल्या कामगारांप्रमाणेच परिसरातील वाडयाताल गरजूंसह सुमारे दोन हजारांना अन्नदान केले जात आहे. या योजनेत महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी होत हा आहे. रोज दुपारी डाळ भात० भातआणि वेगवेगळ्या प्रकारच्या उसळ अश्या प्रकारे कामगारांना जेवण देण्यात येते. कारखाने बंद पडल्याने परराज्यात राहणारे कामगार उपाशी राहू नयेत यासाठी फणशिपाडा ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे.