'वर्षा'वरील पोलिसाला कोरोना
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री येथील निवासस्थानी चहाविक्रेता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंतेचे वातावरण असतानाच आता 'वर्षा' या उद्धव ठाकरे यांच्या सरकारी बंगल्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यालाही लागण झाल्याचे समोर आले आहे. पायधुनी पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या महिला सहायक निरीक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मलबार हिल येथील वर्षा बंगल्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. या सुरक्षा कवचामध्ये या विभागात येणाऱ्या पोलिस ठाण्यांतील पोलिसांची तेथे बंदोबस्तासाठी नेमणूक केली जाते. दोन दिवसांपूर्वी पायधुनी पोलिस ठाण्यातील महिला सहायक निरीक्षकाला वर्षा निवासस्थानी तैनात करण्यात आले. खबरदारी म्हणून बंदोबस्ताला येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासले जाते. त्यानुसार या महिला अधिकाऱ्याचे तापमान अधिक आढल्याने त्यांना वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. वैद्यकीय अहवालात या महिला अधिकारी पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांना तत्काळ दक्षिण मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या पायधुनी पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आला असून माहीम पोलिस वसाहतीमधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधी माहीम पोलिस वसाहतीमधील एका लागण झाल्याचे उघड झाले होते.