महिला पोलीस कर्मचाऱ्यांना चार चाकी गाडीने दिला धक्का : महिला पोलीस कर्मचारी जखमी
टिटवाळा : कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळ पोलीस चौकीच्या समोर लावण्यात आलेल्या नाकाबंदी /लॉकडाऊण मध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीसाला स्कापिओ गाडीने जोरदार धक्का दिल्याने त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून गाडीचालका विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी व कोव्हीड १९ साथीच्या कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिटवाळा पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे ग्रामीण पोलीस दलात सेवेत असलेल्या महिला पोलीस श्रीमती जाधव या कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या म्हारळ बीट पोलीस चौकीच्या समोर लॉकडाऊण /नाकाबंदी साठी कर्तव्यावर होत्या. येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करित असताना धोबीघाट /बिल गेट कडून म्हारळ च्या दिशेने स्कापिओं नं एमएच ०५,बीबी १११ही गाडी भरधाव वेगाने आली. महिला पोलीस जाधव यांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला पण गाडिवर नियंत्रण न मिळवता आल्याने त्यांच्या हाताला जबर धक्का लागला.त्यात त्या जखमी झाल्या त्याना सेंट्रल हॉस्पिटल उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा स्कारपीओ चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, कोव्हीड १९ साथीच्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,पुढील तपास उप निरीक्षक बजरंग रजपूत करत आहेत. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.