शहापूरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी निवासी कुणबी समाज मंडळाचा पुढाकार...
आसनगाव: शहापुर तालुक्यात सध्या अनेक समस्या असून त्या समस्या सोडवण्यासाठी शहापुर निवासी कुणबी समाज मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने त्यानी आमदार दौलत दरोडा यांची भेट घेऊन समस्यांबाबत लेेखी निवेदन दिले आहे. तर मतदारसंघातील असलेल्या धरणांमधून मिळणारा उपकर तालुक्यातील विकासकामांसाठी आणावा. व सदर उपकरातून नागरिकांची देयके माफ करावीत अशीही मागणी शहापुर निवासी कुणबी समाज मंडळाने केल्याने ह्या मागणीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात मोल मजुरी करणारा मजूर, कामगार, लहान-मोठा दुकानदार, व्यापारी व नोकरदार आदींचा रोजगार बुडाल्याने तर हाताला आजही काम नसल्याने हे सर्व आजच्या परिस्थितीत आर्थिक संकटांत आहेत. त्यातच महावितरणने एकदम वीज बिल आकारून ग्राहकांना भरमसाट बिलाच्या माध्यमातून शॉक दिल्याची ओरड सुरू आहे. त्यातच आत्ता अश्या आर्थिक संकटात घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिल व गाळा किंवा घरभाडे कसे भरायचे हया विवंचनेत नागरिक व तालुक्यातील जनता आहे.
त्यामुळे लॉकडाउनच्या काळातील वीज, पाणी, घरपट्टी माफ व्हावी तसेच शासनाकडे यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी शहापूर निवासी कुणबी समाज मंडळातर्फे आमदार दौलत दरोडा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवासी मंडळाचे अध्यक्ष अनिल निचिते, कार्याध्यक्ष मधुकर शिंदे, उपाध्यक्ष रोहिदास गोदडे, उपाध्यक्ष दिनेश घरत, सचिव भानुदास महाराज भोईर व माधव भेरे उपस्थित होते.