पवन पाटील यांची गणिताच्या राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर पदी निवड...
आसनगाव : शहापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गोकुळगाव येथील माध्यमिक शिक्षक पवन भगवान पाटील यांची गणित विषयाच्या राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर पदी निवड झाली आहे. तर विशेष म्हणजे ठाणे जिल्हातुन ४५० शिक्षकांमधून सहा शिक्षकाची निवड करण्यात आली असून पवन पाटील यांचा सहामध्ये समावेश असल्यामुळे सर्वस्तरातुन पवन पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विषयाचे राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षणासाठी १४ जुलै २०१८ रोजी ठाणे जिल्हातुन ४५० शिक्षकांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी ठाणे जिल्ह्यातून सहा शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातून या प्रशिक्षणासाठी २५० शिक्षकांची निवड झाली आहे.
ह्या गणित विषयाचे राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे दोन वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. त्यानंतर सहा जुलै २०२० ला झालेल्या अंतिम परीक्षेत पवन भगवान पाटील यांनी यश मिळवले. व त्यांची गणिताच्या राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि आयआयटी मुंबई यांच्यातर्फे पवन पाटील यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.