गीता माध्यमिक विद्यालय विहिगाव शाळेचा १०० टक्के निकाल ....
कसारा : अतुल्य स्पोर्ट्स फाऊंडेशन हि संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा व शैक्षणिक विकासासाठी कार्य करते. या संस्थेमध्येच मल्लखांबाचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी क्रीडा क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात गीता माध्यमिक विद्यालय विहिगाव येथे शिक्षण घेणाऱ्या जालना आमले (७८.६०%)प्रथम क्रमांक व देविदास कामडी(७६%) द्वितीय क्रमांक पटकावत १० वीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी मिळविलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.
अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही या मुलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच वर्षी गुजरात (अहमदाबाद) येथे झालेल्या राष्ट्रीय एरियल सिल्क स्पर्धेत देविदास कामडी याने वैयक्तिक सुवर्ण,देविदास कामडी व जालना आमले यांनी (मिश्र दुहेरी) महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करतांना सुवर्ण पदक पटकावले होते. या मुलांनी आपल्या मेहनत व जिद्दीने घेतलेल्या या अवकाश भरारीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.लक्ष पुर्ण झाले नसले तरी मिळालेल्या गुणांमध्ये समाधानी असल्याचे देविदास सांगतो.तसेच भविष्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवा करण्याची त्याची इच्छा आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आपले शिक्षक एस.एस.पाटील सर,मयुर सूर्यवंशी सर, चौरे सर तसेच पालक व क्रीडा आणि शिक्षण मार्गदशक श्री.पवन आडवळे यांना दिले.