मुरबाड मधील कुडवली एम.आय. डीसीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू ! पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह !
मुरबाड : सुमारे चार तासांपासून गायब असलेल्या सिक्युरिटी गार्डचा मृत अवस्थेत देह सापडल्याची घटना आज सकाळी मुरबाड एम. आय. डी. मध्ये घडली आहे. किसन काशिनाथ भावार्थे ( २५ ) असे मृताचे नाव असून तो मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानिवली (खुर्द) येथील राहणारा आहे. मुरबाडच्या कुडवली ऍडीशनल एम. आय. डी. मधील सुपर गॅस कंपनीमध्ये तो सुमारे अडीच वर्षांपासून BIS या कंपनी अंतर्गत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. काल सायंकाळी रात्रपाळीला हजर झालेला किसन आज सकाळी साडेसहा वाजेपासून कंपनीमध्ये दिसत नसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली होती.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास किसनचा मोठा भाऊ त्याला जेवणाचा डबा घेऊन कंपनीत आला असता किसन लाईट बंद करण्यासाठी गेल्याचे त्याच्या सहकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सदर जेवणाचा डबा किसनला देण्याचे सांगून तो आपल्या कामाला निघून गेला. मात्र तासाभराने त्याने पुन्हा किसनला दोन वेळा कॉल केल्यावर तो अद्याप आला नसल्याचे सिक्युरिटी केबिनमधून त्याला सांगण्यात आल्याने तो कंपनीकडे आला व किसनची शोधाशोध सुरू झाली. त्याचे बूट कंपनीमधील एका पाण्याच्या टाकी जवळ आढळून आल्याने संशयाचे निरसन करण्यासाठी सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास ३ लक्ष लिटर पाणी भरलेली सदरची टाकी पोलिसांच्या मदतीने रिकामी करण्यात आली आणि धक्कादायक प्रकार समोर आला. किसनचा देह सदर टाकीमध्ये त्याच्या सेक्युरिटी गणवेशाच्या साहाय्याने शरीराला मोठा दगड बांधल्याच्या मृत अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले.
सदर घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुरबाड पोलिसांनी ऍम्ब्युलन्समधून सदर शव शासकीय रुग्णालयात पाठवले. किसनच्या पश्चात त्याचे आईवडील, विवाहित मोठा भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे. मानिवली(व्यापारी) गावातील मनमिळाऊ, स्वच्छ प्रतिमेचा तथा छान स्वाभाविक तरुण म्हणून किसनची ओळख आहे. त्यामुळे या घटनेने गावकऱ्यांना मानसिक धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र हा प्रकार नेमका काय आहे? याबाबत मुरबाड पोलिस तपास करीत असून सदरची सत्यघटना सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. तर या घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी, व आम्हांला न्याय मिळावा अशी मागणी किसनचे कुटुंबीय करीत आहेत.