शहापुर तालुक्यातील चैतन्य विद्यालय गुंडे शाळेचा १०० टक्के निकाल.
डोळखांब :ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था वाडा संचलित चैतन्य विद्यालय गुंडे शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.दहावीमधील प्रज्ञा धनाजी गायकवाड व पल्लवी सदाशिव चौधरी या दोन्ही विद्यार्थिनींनी ९०.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.सचिन लक्ष्मण करवाळे याने द्वितीय क्रमांकाचा मानकरी होत ९०.४० टक्के गुण मिळवले आहेत तर ८८.२० टक्के गुण मिळवत दीपाली दत्तात्रय विशे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.तीनही विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.
यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचं अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.हे विद्यालय अतिदुर्गम भागात असल्याने ग्रामीण जिवनमानामुळे येथील विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो.मात्र विद्यार्थ्यांना समस्या सोडवून त्यांना काहीतरी अधिक मिळालं पाहिजे या निर्मळ भावनेतून येथील सर्व शिक्षक झटत असतात.आमचं विद्यालय ग्रामीण भागात असलं तरी गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहीलं आहे,यापुढेही विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची एकत्रित प्रतिक्रिया विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक एल.देशमुख व शिक्षकवृंदांनी दिली.