शहापुर तालुक्यात महावितरणला १५ कोटीच्या थकबाकीचा शॉक ....
आसनगाव : शहापूर तालुक्यात महावितरणच्या ७८ हजार ३८२ विजग्राहकांपैकी अवघ्या १९ हजार वीज ग्राहकांनी वीज बिल भरले आहे. त्यामुळे १५ कोटीच्या थकबाकीचा शॉक महावितरणला ग्राहकांनी दिला आहे. दरम्यान उर्वरित थकबाकीदार ग्राहकांनी लवकरात लवकर वीज बिल भरुन कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे शहापुर उपविभागीय उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी केले आहे.
तालुक्यात ६९ हजार घरगुती, ७ हजार व्यवसायिक,१३३० शेती, ८३० छोटे कंपनीधारक तर ५०० मोठे कंपनीधारक असे एकूण ७८ हजार ६६० वीज ग्राहक आहेत.ह्या एकूण ग्राहकांपैकी अवघ्या १९ हजार विज ग्राहकांनी वीजबिल भरले असून ५९ हजार ६६० विजग्राहकांनी वीज बिल न भरल्याने बिलाची थकबाकी १५ कोटींच्या घरांत गेल्याने ग्राहकांच्या थकबाकीचा शॉक महावितरणला बसला आहे.
तसेच विशेष म्हणजे तालुक्यातील घरांची संख्या आणि वीज जोडणीची संख्या यामध्ये १० हजार वीज जोडणीची तफावत आहे.तसेच तालुक्यात आकडे टाकुन वीजचोरीही होत असल्याची खंतही महावितरणच्याअधिकाऱ्यांनी माहिती देतांना व्यक्त केली.तर लॉकडाऊनमध्ये थकलेले वीजबिल ग्राहकांना हप्त्याने भरण्याची सवलत आहे. असेही माहिती देतांना उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी सांगितले.