कल्याणमध्ये अंध श्रद्धेतून माय लेकाची हत्या.
कल्याण : अंगात भूत असल्याच्या कारणावरुन झालेल्या बेदम मारहाणीत आई आणि मुलाचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . एकिकडे कोरोनामुळे सर्वजण हवालदिल झाले असताना कल्याण जवळील अटाळी गावात घडलेल्या या प्रकाराने खलबळ उडवून दिली आहे .याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मांत्रिकासह ३ जणांना अटक केली असून एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे .
चंदूबाई शिवराम तरे ( ७६) आणि पंढरीनाथ शिवराम तरे ( ५० )अशी या प्रकरणात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत . अटाळी गावातील तथाकथित मांत्रिक सुरेंद्र पाटील याने चंदूबाई आणि पंढरीनाथ यांच्या अंगात भूत असल्याचे पंढरीनाथ तरे यांच्या पत्नी आणि पुतणीला सांगितले अंगातील हे भूत बाहेर काढण्यासाठी २५ जुलै रोजी राहत्या घरात दोघींच्याही ( चंदूबाई व पंढरीनाथ ) अंगावर हलद टाकुन नातेवाईकांनी लाकडी दांडक्याने दुपारी साडेचार ते रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत मारहाण केल्याचे दाखल तक्रारीत नमुद करण्यात आले आहे .तर तब्बल ४ तासाहुन अधिक काल हा सर्व प्रकार सुरु होता .ज्यामध्ये इंदूबाई आणि पंढरीनाथ या दोघांनाही आपला जीव गमवावा लागल्याचेही यामध्ये नमुद करण्यात आले आहे .
दरम्यान या सर्व भयानक कृत्याप्रकरणी देवेंद्र भोईर ( पंढरीनाथ यांचा भाचा ) यांच्या तक्रारी वरून खडकपाडा पोलिसांनी भा.द.वि.कलम ३०२,३४ सह अंधश्रद्धा निर्मुलन क़ायदा २०१३ च्या क़लम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करत मांत्रिकासह पंढरीनाथ तरे यांच्या पुतण्या-पुतणीला अटक करत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे .