बिबट्या आढळलेल्या परिसरात डोळखांब वनविभागाकडून लाऊड स्पीकरद्वारे सूचना दिल्या..
डोळखांब : तालुक्यातील मौजे चोंढे.बु गावाच्या हद्दीत मागील आठवड्यात रात्री व दिवसाही बिबट्याचे दर्शन झाले होते.बिबट्याच्या या मुक्त संचाराने स्थानिक नागरिक व पाळीव प्राण्यांना विशेष धोका निर्माण झाला होता.याधीही या बिबट्याने स्थानिक आदिवासी वाड्यापाड्यांतील गरीब शेतकऱ्यांच्या गाई,शेळ्या फस्त केल्याच्या घटना घडून आल्या होत्या.बिबट्या आढळून आल्या संदर्भात वृत्तप्रसिद्धी केल्यानंतर डोळखांब वनविभागाने प्रसंगावधान राखत नागरिकांनी खबरदारी बाळगण्यासाठी लाऊड स्पीकरद्वारे सूचना दिल्या आहेत.
बिबट्याचा हा मुक्त वावर येथील नागरीकांसाठी नवा नसला तरी साकुर्ली वनक्षेत्राचे वनपाल जयवंत फर्डे यांनी तत्परता दाखवत चोंढे बु.परिसरात आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सूचना देणारे बॅनर लावले आहेत.बिबट्या हा प्राणी शक्यतो माणसांना इजा करत नसून कुत्रे व इतर पाळीव प्राण्यांची शिकार करण्यासाठी गावाकडे आल्यास ढोल किंवा थाळीनाद करून पळवून लावावे अशा प्रकारच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.वन्यजीव प्राण्यांना इजा करणे हा कायद्याने गुन्हा आहे हे पटवून देऊन नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्यासाठी आवाहन केले आहे.