महापालिका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या व्हर्च्युअल क्लासरुमचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे - विद्यार्थी हे समाजाला दिशा देणारा महत्वपूर्ण घटक आहे, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच शाळा बंद असल्या तरी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी महापालिका शाळेत दहावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देता यावे यासाठी व्हर्च्युअल क्लासची निर्मिती करण्यात आली असून याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी विषणुनगर येथील शाळा क्र. १९ मध्ये झालेल्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलताना केले.
कोरोनामुळे शाळा बंद आहेत परंतु दहावीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणि नुकसान होवू नये यासाठी महापालिकेने अभिनव अशी संकल्पना सुरू करुन व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा उपक्रमाचं उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून महापालिका शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा निश्चितच फायदा होणार आहे. ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आणि विविध सामाजिक संस्थांनी उपलब्ध करुन दिलेल्या हॅप्पीनेस किटचे वाटप करण्यात आले. या हॅप्पीनेस किटमध्ये जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी सॅनिटायजर, मास्क आदींचा समावेश आहे.
महापालिकेने सुरू केलेल्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, मोबाईल, टॅब, लॅपटॉप हे केवळ खेळण्यासाठी नसून त्याचा सदुपयोग करावा, सामाजिक अंतर ठेवावे, तसेच कोणीही व्यक्ती मास्क न लावता फिरत असेल तर त्याला मास्क लावण्याबाबत जागरुक करण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे असेही महापौरांनी यावेळी सांगितले. यावेळी दहावीत उत्तम गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. महापालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमास सहकार्य करणा-या रिलायन्स फाऊंडेशन, श्री श्री रविशंकर फाऊंडेशन, कॅपजेमिनी प्रा.लि आणि अक्षयपात्र या संस्थांचे महापौरांनी आभार मानले.