गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ठाणे - गेले दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली असली तरी ऐन गणेशोत्सवापूर्वी झालेल्या पावसामुळे गणेश भक्तांच्या खरेदीवर विरजण पडलं आहे. गेले दोन दिवस शहराप्रमाणेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. या जोरदार पावसामुळे भातसा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
काल संध्याकाळी ६ वाजल्यापासून भातसा धरणातून प्रतिसेकंद २३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून आज दुपारी दीड नंतर पाण्याच्या विसर्गात वाढ झाली असून आता प्रति सेकंद १०७ पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे भातसा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातही पावसानं जोरदार हजेरी लावली असून सकाळी साडेआठपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत ३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल आणि आज झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचणं तसंच झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.