कल्याण: दत्तआळी मधल्या दत्त देवस्थानासमोरील २०० वर्ष जुने वडाचे झाड उन्मळून पडले
कल्याण- लालचौकी जवळील दत्त आळीमधल्या प्रसिद्ध दत्त देवस्थानासमोरील २०० वर्ष जुने असलेले वडाचे झाड रविवारी रात्री उन्मळून पडले. प्रचंड मोठे असे हे झाड मंदिराच्या बाजुला असलेल्या पुजा-यांच्या घरावर पडले. सुदैवाने त्यावेळेस पुजारी घरात नसल्याने मोठा अनर्थ टळला परंतु घराचे मोठे नुकसान झाले आहे. बाजुला विजेचा खांब पुर्णपणे क्षतिग्रस्त झाल्यामुळे परिसरातील वीज पुर्णपणे खंडीत झाली होती.
सोमवारी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर काम हाती घेवून झाड घरावरुन बाजुला केले तसेच वीजमंडळाच्या कर्मचा-यांनी नविन खांब उभारून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत चालू केला.एवढे मोठे झाड उन्मळून पडले असतानाही काही जिवीत हानी झाली नाही ही भगवंताची कृपा होय अशी देवस्थानच्या मंडळींनी भावना व्यक्त केली.तसेच सणासुदीच्या काळात अग्निशमन दलाने व विजमंडळाने युध्दपातळीवर काम हाती घेवून अडचण दुर केल्याने त्यांचे आभार मानले.