शहापुर तालुक्यासह धरण क्षेत्रात पडतोय मुसळधार पाऊस...
शहापुर : तालुक्यात आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी धरणांसह नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर नदी काठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचेही संबधीत विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
शहापूर तालुक्यात मागील वर्षी २९६३ मिलिमीटर इतका एकुण पाऊस पडला होता. तर यंदा तालुक्यात पावसाने जून महिन्यात दमदार सुरुवात केली. त्याअनुषंगाने भात पीक लावणी हंगामाला चांगलाच वेग आल्याचे चित्र असतांनाच गेले काही दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.तर मुबंईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत होता. त्यातच ऑगस्ट महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. तर गेले कित्येक दिवस तालुक्यात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील धरणांसह नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर शुक्रवारी एका दिवसात ८५ मिलिमीटर पाऊस पडल्याने आत्तापर्यंत तालुक्यात एकूण १९१८मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.