जेईई-नीट परीक्षेबाबत केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने
ठाणे - एकीकडे कोरोना महामारीमुळे केंद्र सरकार ऑनलाईन आणि व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आपले कामकाज चालवला जात आहे. मात्र देशभरात जेईई- नीटची परीक्षा घेऊन सुमारे २५ लाख विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण केला जात असल्याचा आरोप करीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
सद्यस्थितीत सूरू असलेल्या कोरोना च्या भयंकर परिस्थितीमध्ये केंद्रातील भा.ज.पा.सरकारने जेईई- नीट च्या परिक्षा घेण्याच्या निर्णयामुळे देशभरातील पालक – विद्यार्थ्यांमध्ये यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जेईई-नीटच्या परिक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने केद्र सरकार आणि त्या त्या राज्यातील सरकार यांनी एकत्रित बैठका घेउन निर्णय घ्यावा असे निर्देश दिले, पंरतु राज्यातील सरकारला विश्वासात न घेता केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना कोरोनाच्या घशात ढकलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ही अरेरावी विद्यार्थी सहन करणार नाहीत. ज्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने कुलगुरुंशी चर्चा करुन अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. तसेच केंद्र सरकारनेही करावे, अशी मागणी करण्यात आली.