अभिनेत्री पायल घोषच्या तक्रारीनुसार अनुराग कश्यप यांना अटक करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी
ठाणे: अभिनेत्री पायल घोष यांच्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप अनुराग कश्यप यांची चौकशी केली नाही. येत्या सात दिवसांत मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांच्यावर कोणती कारवाई केली नाहीतर मुंबईत रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिला आहे.आज अंधेरीत कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्र येथे अभिनेत्री पायल घोष आणि ना.रामदास आठवले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी रिपाइंचे माजी मंत्री राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर,सुरेश बारशिंग, केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव,लाखमेन्द्र खुराणा,एम एस नंदा, रमेश गायकवाड,जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव,अॅड. नितीन सातपुते,किशोर मासुम,रतन अस्वारे, तरणजीत सिंह, घनश्याम चिरणकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
माझ्या जीवाची आणि इज्जतीची पर्वा न करता मी अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार केली आहे.माझ्या जीवाला धोका आहे.माझ्या या संकटकाळात केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिल्याने मला हिम्मत मिळाली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानत असल्याचे अभिनेत्री पायल घोष यावेळी म्हणाली कोणत्याही महिलेने तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस तातडीने कारवाई करून आरोपीला अटक करतात.मात्र अभिनेत्री पायल घोषने तक्रार करून आता ७ दिवस झाले तरी अनुराग कश्यपला चौकशी साठी ही पोलिसांनी बोलाविले नाही.याप्रकरणी काही लोक अनुराग कश्यप चांगला असल्याचे मत व्यक्त करीत असले तरी ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.पायल घोषला मात्र अनुराग कश्यपचा वाईट अनुभव आल्याने तिने त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी मुंबईचे सह पोलीस आयुक्त उपायुक्त आणि वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी आपण बोललो असून पायल घोषला न्याय देण्याबाबत चर्चा केली आहे.पायल घोषने स्वतःच्या जीवाची आणि इज्जतीची पर्वा न करता अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.बॉलिवूड मध्ये नवीन आलेल्या कलाकारांना करियर घडविण्यसाठी धडपडणाऱ्या नव्या कलाकारांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये म्हणुन पायल घोषच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा आहे.याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई केली तर नव्या कलाकारांचे कोणीही शोषण करणार नाही त्यामुळे येत्या ७ दिवसांत अनुराग कश्यपला पोलिसांनी अटक करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष तीव्र आंदोलन छेडेल असा ईशारा ना.रामदास आठवले यांनी दिला आहे.अभिनेत्री पायल घोषला मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्राबाहेर रमेश पाईकराव, रमेश पाळंदे, आदी अनेक रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन पायल घोषला पाठिंबा देत असल्याबाबत घोषणा देत होते.