ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी सेनेचा तीव्र विरोध
रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा विश्वनाथ पाटील यांचा इशारा
वाडा: सध्या महाराष्ट्रात शासकीय, राजकीय व सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा विषय चर्चत आहे. मराठा समाजाला सरकारने १२ टक्के आरक्षण देऊ केले आहे. मात्र हे आरक्षण ओबीसी आरक्षणातून सरकार देत असेल तर त्याला आमचा विरोध असून असे केल्यास राज्यभर रस्त्यावर उतरून आरक्षणाचा वणवा पेटवू असा सज्जड इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आज वाडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
राज्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा व खानदेश या प्रदेशात कुणबी समाजाची संख्या सुमारे ३५ टक्के असून हा समाज अतिशय तुटपुंज्या शेतीवर गुजराण करीत आहे निर्सगाचा कोप व शासनाचे चुकीचे धोरण अपुरे शिक्षण ह्या मुळे स्वातंत्र्यानंतर हा समाज अतिशय मागासलेपणाचे जीवन जगत आहे.नोक-यांचा अभाव व तुटपुजी शेती यामुळे कर्जबाजारी झाला आहे. ओबीसी वर्गात मोडत असलेला बारा बलुतेदार वर्गही हलाखीचे जीवन जगत आहे. ओबीसी वर्गात सुमारे ३५० जातीचा समावेश करण्यात आला असल्याने कुणबी समाजाला सामाजिक न्याय यापासून वंचित केले जात आहे. वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे बाराबलुतेदार वर्गात मोडणा-या सर्व जातींमध्ये असंतोषाची भावना असताना मराठा समाजाचा समावेश ओबीसी वर्गात केल्याने अधिक मागास असलेल्या जातींवर अन्याय होणार असल्याचे पत्रकार परिषदेत पाटील यांनी सांगितले.
पेसा कायद्यावर बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात पेसा कायद्यामुळे आदिवासींसाठी १०० टक्के आरक्षण घोषित केल्याने त्याचा जबर फटका ठाणे, पालघर, धुळे,नाशिक, नंदुरबार, चंद्रपुर, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यातील ओबीसी समाजाला बसला आहे. त्यातच आता मराठा आरक्षण दिल्याने ओबीसी समाज पुरता देशोधडीला लागणार असल्याचे विश्वनाथ पाटील यावेळी बोलताना स्षप्ट केले.
सन 1939 नंतर जातनिहाय जनगणना जाहीर झालेली नसताना मराठा समाजाला १२ टक्के आरक्षण दिले कुठून? त्यासाठी कोणते निकष लावले हे सरकारने जाहीर करावे असा सवालही त्यांनी सरकारला केला.बारा बलुतेदार संघटनांना एकत्र करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.अलिकडेच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन देऊन ओबीसींवर होत असलेल्या अन्यायासंदर्भात कैफियत चर्चेदरम्यान मांडली.पत्रकार परिषदेत विश्वनाथ पाटील यांच्या समवेत तालुका प्रमुख प्रल्हाद शिंदे, नेते आत्माराम भोईर, नितीन पाटील,सतिश पष्टे, राजन नाईक,प्रदीप हरड आदी पदाधिकारी उपस्थित होते.