शहापुर तालुक्यात भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
खर्डी : मागील एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहापूर तालुक्यातील कसारा विभागात कुंडन,उंबरमाळी, अजनुप या भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांवर करपा (लाशा) या रोगाचे मोठया प्रमाणात प्रादृभाव झाला असल्याने या गावातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हातचा गेला असल्याने येथील शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
शहापूर तालुक्याचे माजीआमदार पांडुरंगजी बरोरा यांनी खर्डी परिसरातील कुंडन,अजनुप येथील शेतकऱ्यांसमवेत भातपिकांची पहाणी करून महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क करून शेतकऱ्यांच्या भातपिकांची झालेल्या नुकसानीची माहिती देऊन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली.दादासाहेब भूसे यानी तात्काळ कृषी विभागाला पंचनामा करण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी पांडुरंग बरोरा यानी सांगितले. यावेळी शहापुरच्या पंच सभापती रेश्मा मेमाणे, जिप सदस्य विठ्ठल भगत,पंच सदस्य राजेंद्र कामडी, शिरोळचे उपसरपंच सचिन निचिते,गजमल भवर,कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.