शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात;सरत्या पावसामुळे भातशेती धोक्यात...
कर्जत : तालुक्यातील शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.यावर्षी अचानक आलेले चक्रीवादळ व सरता पाऊस यामुळे शेतकरी पुर्णपणे संकटात सापडले आहेत.संपूर्ण कर्जत तालुक्यात भाताचे पीक जमिनीवर कोसळून गेले असून आता शेतकऱ्याला पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात कोसळलेले भाताचे पीक यांचे तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील शेतकरी हे भाताची शेती जून महिना चालू झाला की करायला सुरुवात करतात. यावर्षी भाताच्या बियाणांची लागवड करायला शेतकऱ्याला पावसाची वाट पाहावी लागली होती.जून महिन्याचे अखेरीस पावसाने हजेरी लावल्यानंतर पाऊस जुलै महिन्याचे दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा गायब झाला होता.त्यामुळे काही भागात भाताची लागवड शेतकऱ्यांना अर्धवट टाकून द्यावी लागली होती.शेतात पाणी नसल्यामुळे अर्धवट भाताची लावणी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे पूर्ण करता आली .त्यानंतर अधिक पडणारा पाऊस यावर्षीच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात आला. पावसाच्या अनियमितते मुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी अडचणी सापडले आहेत. अशा परिस्थितीत भाताचे पीक बहरू लागल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सरत्या पावसाने शेतात उभा असलेल्या भाताच्या पिकाची नासाडी सुरू केली.
मागील दोन - तीन दिवसात कोसळलेल्या पावसाने भाताचे पीक उभ्या शेतात जमिनीवर कोसळले आहे. त्यात अजून १५ दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे.त्यामुळे अशावेळी भाताचे पीक आणखी काही दिवस पाण्यात बुडालेल्या अवस्थेत राहणार आहे.ही स्थिती कायम राहिल्यास भाताचे पीक कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.शेतात जमिनीवर पडलेल्या पिकाची कापणी करून शेताबाहेर देखील आणू शकत नाही.या सर्व बाबीचा विचार करता तालुक्यातील शेतकरी शासनाकडे मदतीची मागणी करू लागले आहेत.तसेच नुकसान ग्रस्त शेतातील भाताच्या शेतीचे पंचनामे करावेत. अशी मागणी करू लागले आहेत.
"यावर्षी जून महिन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तसेच आता सरत्या पडलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.शासनाने नुकसान ग्रस्त शेताची पिकाची पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करावे"
हरिश्चंद्र पाटील
( शेतकरी, बोरगाव )