केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याच्या पहिला फटका मुरबाड इंडस्ट्रीला...
धानिवली येथील टेकनोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लि कंपनीचा पॉवर प्लांट अचानक केला बंद
मुरबाड : नुकताच केंद्र सरकारने पारित केलेल्या कामगार विरोधी कायद्याची अमंलबजावणी सुरु झाली असुन त्याचा पहिला फटका मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील धानिवली येथील टेकनोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लि.या मुरबाड मधील सर्वात मोठ्या कंपनीचा पॉवर प्लांट कारखाना शुक्रवार २५ सप्टेंबर पासून कुठल्याही प्रकारची पुर्व सुचना न देता कायम स्वरुपी बंद करण्यात आल्याने तेथे कायम स्वरूपात काम करणारे सुमारे ६०-७० कामगार बेरोजगार झाले आहेत.या प्लांट मध्ये एकट्या धानिवली गावातील ३५-४० तर परिसरातील २५-३०कामगार काम करत होते.
टेकनोक्राफ्ट कंपनीच्या प्रवेशद्वारावर या संबंधी जाहिर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंपनीने नोटीस लावण्यापूर्वीच कायद्यानुसार थकबाकी , भरपाई च्या निवेदनासह सेवा समाप्तीपत्र व धनादेश कामगारांना पाठवले आहेत. नोटीसीत सर्व कामगारांना कळविले आहे की दि २७ जुलै २०२० रोजी दिलेल्या नोटीस नुसार २५ सप्टेंबर २०२०पासून पॉवर प्लान्ट कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.
या बाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता याची माहिती सोमवारी २८ सप्टेंबर रोजी मिळेल असे सांगण्यात आले. केंद्र सरकारचे नवीन कामगार विधेयक संसदेत पारित होताच नव्या कायद्यानुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कंत्राटी ठेवण्याची मुभा त्याच प्रमाणे तीनशे पेक्षा कमी कामगार असतील तर त्यांना कधीही कामावरून काढू शकतात .या नव्या धोरणानुसार हा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कामगार वर्गातून सरकारच्या नवीन कामगार विधेयका बाबत संताप व्यक्त होत आहे.