जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा आशा स्वयंसेविकांचा संकल्प
माझे कुटुंब माझी जबाबदारी, आशांची दमदार कामगिरी
ठाणे: माझं गाव हे माझं कुटुंबच आहे, हे गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करत आहोत, गृहभेटी, हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या तीन नियमांचा वापर आणि कुटुंबातील सदस्यांची तपासणी ही कामे करून आम्ही आमचे गाव पर्यायाने आमचा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्याचा संकल्प आमचा संकल्प आहे. अशी निखळ भावना ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व्यक्त करत आहेत.कोरोनाच्या लढ्यात आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीसाठी आशा दमदार काम करत आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा अंतर्गत ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका काम करतात. दैनंदिन संदर्भसेवा देण्याबरोबरच सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी एक हजार एकशे एक आशा गावोगाव कार्यरत आहेत. गृहभेटी देणे, नागरिकांना कोव्हिडं संदर्भात कशी काळजी घ्यावी याचे शिक्षण देणे, लोकांचे तापमान, शरीरातील प्राणवायूची पातळी यंत्राद्वारे मोजण्याचे महत्वाचे काम त्या करतात. आणि ही माहिती माझे कुटुंब माझी जबाबदारी अँपवर नोंदवतात. नियमित संदर्भीय सेवा यामध्ये प्रामुख्याने मातृ वंदना योजनेचे फॉर्म भरून घेणे, बालकांचे लसीकरण करणे, गरोदर,स्तनदा माता यांना संदर्भ सेवा देणे आदी कामही त्या करत आहेत.
कोव्हिडं काळात आशास्वयंसेविका करत असलेले काम कौतुकास्पद आहे. नित्याची कामे सांभाळत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी त्यांचे योगदान अतुलनीयच म्हणावे लागेल , त्यांच्या समाधानकारक कामगिरीमुळेचे आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करू शकतो असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रभारी) डॉ.रुपाली सातपुते व्यक्त करतात.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यात सुरू असून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका, २ नगरपालिका , नगर पंचायत आणि ग्रामीण भागात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपयुक्त सूचनामुळे जनसहभाग वाढतो आहे. माझी सोसायटी माझी जबाबदारी, माझा ऑर्ड माझी जबाबदारी, माझा गाव माझी जबाबदारी, माझा परिसर माझी जबाबदारी असा पद्धतीने या मोहिमेत लोकसहभाग वाढतो आहे.या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रयत्नरत आहे. जिल्ह्यात साडेतीन हजार पथकांच्या माध्यमातून २६ लाख ५० हजार घरांना भेटी देण्यात येणार आहेत.