वासिंद मध्ये एकाच रात्री चोरट्यांनी आठ दुकाने फोडली.
वासिंद: एकाच रात्रीत वासिंद शहरामधील आठ दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी करून खळबळ उडवून दिली आहे. मंगळवारी रात्री वासिंद पुर्वेकडील दोन तर पश्चिमेकडील सहा दुकाने फोडण्यात आली आहेत. यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र मधील ६० हजार रूपयांचे दोन लॅपटॉप चोरी झाले, समर्थ कृपा जनरल स्टोअर्स, समर्थ कृपा मेडिकल, श्री समर्थ कृपा कलेक्शन, आनंद मेडिकल, ९० डिग्री केक शॉप, हरीओम सुपर मार्केट अशी चोरी झालेल्या दुकानांची नावे आहेत. याबाबत दुकानमालकांनी वासिंद पेलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वासिंद व्यापारी मंडळाच्या वतीने वासिंद पोलिस स्थानकात चोरट्यांचा बंदोबस्त होण्याबाबत ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.
यामध्ये यापुर्वी झालेल्या चो-यामध्ये चोरी करणारे बालगुन्हेगार होते ते सुटून जातात त्यांच्यावर ठोस उपाययोजना करणे, विना नंबरप्लेटच्या मोटारसायकल, गाड्यांची तपासणी करणे व कडक कारवाई करणे, वासिंदच्या एंट्री पॉईंटला रात्री १२ नंतर येणा-या - जाणा-या गाड्यांची तपासणी करणे आदी मागण्या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीची आवश्यकता जेथे लागेल तेथे आर्थिक सहकार्य करण्याची तयारी व्यापारी मंडळातर्फे दर्शवली आहे. याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असे वासिंद पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गुरव यांनी सांगितले असल्याचे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे यांनी सांगितले. एकाच रात्रीत मोठ्या प्रमाणावर चो-या झाल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.