अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला अपयश..
उल्हासनगर: भाजपाचे अधिकांश नगरसेवक असल्याने साईपक्षाला भाजपात विलीन करून महापौर पद मिळवण्यासाठी कंबर कसणाऱ्या भाजपाचा डाव शिवसेनेने ओमी कालानी यांच्या सोबतीने हाणून पाडून महापौर पद बळकावले होते.याच निवडणुकीची पुनरावृत्ती करताना शिवसेनेने भाजपाचेच विजय पाटील यांना उमेदवारी देऊन स्थायी समिती सभापती पद अर्थात उल्हासनगर पालिकेच्या तिजोरीच्या चाव्याही बळकावल्या आहेत.तब्बल चार वेळेस स्थायी समिती सभापती पद मिळवणारे उल्हासनगरातील पीएम म्हणून ओळखले जाणारे प्रकाश माखिजा यांची खेळी यावेळी निष्प्रभ ठरली आहे.
महाविकास आघाडीकडे ७ आणि भाजपाकडे ९ ही विजयी आकडेवारी असल्यामुळे स्थायी समिती सभापती पदावर भाजपाच्या जया माखिजा यांचाच विजय होणार हे निश्चितच होते.मात्र शिवसेनेच्या वतीने सुचक व अनुमोदन देऊन भाजपाचेच विजय पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीला कलाटणी दिली.समसमान ८ मतदान झाल्याने नशिबाचा खेळ चिट्ठीवर होणार असे चित्र असतानाच भाजपाचे स्थायी सदस्य डॉ.प्रकाश नाथानी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने भाजपा संख्याबळा अभावी बॅकफुटला गेली.आणि बाजी पूर्णपणे पलटून गेली.नाथानी यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडी ८ व भाजपा ७ असे संख्याबळ झाल्याने शिवसेनेचे विजय पाटील विजयी होणार असे चित्र निर्माण झाले.
मात्र चार वेळेस स्थायी समिती सभापती पदाचा अनुभव असलेले पीएम अर्थात प्रकाश माखिजा करिश्मा करतील काय?माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे विजय पाटील यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी कोणती खेळी खेळणार काय?या प्रश्नांनी उल्हासनगरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,जेष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी प्रभावशाली यंत्रणा हाताळली.व महाआघाडीतील ७ व उमेदवार विजय पाटील यांना ठाण्यातील टिपटॉप प्लाझा व सत्कार या हॉटेलमध्ये ठेवले.तिथूनच पीठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुकीत ऑनलाइन मतदान प्रक्रिया हाताळण्यात आल्यावर शिवसेनेचे विजय पाटील यांना ८ व भाजपाच्या जया माखिजा यांना ७ मते मिळाली आणि स्थायी समिती सभापतीची माळ विजय पाटील यांच्या गळ्यात पडली.विजय पाटील यांचा विजय हा शिवसेनेच्या विकास कामांवर विश्वास असल्याचे प्रमाण आहे.त्यामुळेच त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज सादर केला.आणि आम्ही आमच्यावरील विश्वास सार्थक करून दाखवला.अशी प्रतिक्रिया खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
३० वर्ष राजकारणात असून त्यातील अधिकांश कालावधी हा शिवसेनेसोबतचा आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली त्याचे चीज करून दाखवणार असे सभापती विजय पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,महापौर लिलाबाई आशान,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे,शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,उपमहापौर भगवान भालेराव,सभागृहनेते भारत गंगोत्री,जेष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर,धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, अरुण आशान, दिलीप गायकवाड,कैलास तेजी,संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.विजय पाटील यांचा विजय होताच महाविकास आघाडीच्या वतीने पालिकेच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी केली.सहायक पोलिस आयुक्त डी.डी.टेळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर,सहायक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे,ईश्वर कोकटे,महिला उपनिरीक्षक प्रियंका सादळकर यांनी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.