भिवंडीच्या नांदकर नदीतून रेती माफियांकडून सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा सुरूच 


भिवंडी : तहसील अंतर्गत येत असलेल्या नांदकर येथील काळू नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती माफियांकडून अवैध वाळू उपसा सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.काळू नदीच्या पात्रात नांदकर येथे सक्शन पंपाद्वारे दिवस-रात्र अवैधपणे वाळू उपसा होत असल्याने या विरोधात भूमिपुत्र एकवटले असून अवैध वाळू उपसा तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी नांदकर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोज पाटील यांनी तहसीलदार आदीक पाटील यांच्याकडे केली आहे.


राज्यातील नद्या ,खाडी तसेच समुद्र किनारे आदी किनाऱ्यांवर सक्शन पंपाद्वारे बेसुमार वाळू उपसा केला गेल्याने नैसर्गिक किनाऱ्यांचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याने राज्य शासनाने नदी ,खाडी अथवा समुद्रातून सक्शन पंपाद्वारे रेती उत्खनन करण्यावर बंदी घातली आहे .मात्र असे असताना भिवंडी तहसील अंतर्गत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे.याकडे भिवंडी महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून संबंधित अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. काळू नदीवर आंबिवली , नांदकर गावाला जोडणारा एक बंद पूल असून त्याचे खांब पूर्णपणे मोडकळीस आले आहेत. 


 या पुलाच्या दोन्ही बाजूला सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे.त्यामुळे हा मोडकळीस आलेला पुल अचानकपणे कोसळू शकतो तसेच या अवैध सक्शन पंपावर काम करणारे गरीब मजूर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडू शकतात याकरिता येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन अवैध वाळू उपसा तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे याबाबत ग्रामस्थ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून सक्शन पंपाद्वारे होत असलेला वाळू उपसा तात्काळ थांबविण्याची विनंती करणार आहेत. या अवैध सक्शन पंपाद्वारे दिवसरात्र वाळू उपसा करणाऱ्यांवर भिवंडी महसूल विभाग काय कारवाई करतात ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...