समन्वय साधूनच रस्तेकामांची सुरूवात करा; लोकप्रतिनिधींची शासकीय यंत्रणांना सूचना
बदलापूर :रस्ते रूंदीकरण आणि कॉक्रीटीकरण करत असताना फुटणाऱ्या जलवाहिन्या, वीज वाहिन्यांचा आणि खांबांचा अडथळा, काम पूर्ण झाल्यानंतर इतर वाहिन्यांना टाकण्यासाठी करावे लागणारे खोदकाम यामुळे कायम अडथळे बनलेल्या रस्तेकामात सुसुत्रता आणण्यासाठी या सर्व यंत्रणांची संयुक्त सभा अलीकडेच बदलापूर पालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सर्व विभागणी (खात्यांनी) एकमेकांशी समन्वय साधूनच रस्ते काम करण्याची महत्वपूर्ण सूचना सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना केली.
रस्ते रूंदीकरणामुळे आणि कॉंक्रिटीकरणामुळे शहरवासियांचा प्रवास सुखकर आणि जलद होत असला तरी या कामांमध्ये प्रशासकीय यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय नसल्यामुळे अनेकदा रस्ते काम सुरू असताना नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना जलवाहिन्या फुटून त्यातून लाखो लीटर पाणी वाया जात असते. त्याचसोबत अनेकदा विद्युत वाहिन्या तुटल्याने परिसराच्या वीज पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असतो. रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एखाद्या नव्या प्रकल्पासाठी वाहिन्या टाकत असताना नव्याने तयार केलेला रस्ता खोदावा लागतो. त्यामुळे त्याचा फटका रस्ते वाहतूकीला आणि नागरिकांना बसतो. बदलापूर शहरात सध्या १४ रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहेत. या रस्त्यांच्या कामात पाणी पुरवठा करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज पुरवठ्याची जबाबदारी असलेले महावितरण यांच्याशी समन्वय न साधल्याने गोंधळ होत असतो. वीज वा जलवाहिन्या तुटल्या तर संबंधित अधिकाऱ्यांना कळविले जात नाही परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतो.
हा गोंधळ रोखण्यासाठी अलीकडेच बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, जीवन प्राधिकरण, पालिकेचे अभियंते, स्थानिक आमदार किसन कथोरे, प्रशासक जगतसिंग गिरासे, मुख्याधिकारी दीपक पुजारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सर्वच यंत्रणांनी रस्ते कामाला सुरूवात करण्यापूर्वीच संयुक्त सर्वेक्षण करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाच ते सहा फुट जागा विद्युत आणि जल वाहिन्या टाकण्यासाठी ठेवण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. त्यासोबतच जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या रस्ते कामात हटवण्यासाठी प्रकल्पात त्याचा समावेश करावा असाही सूर यावेळी लोकप्रतिनिधींनी लावला. यावेळी उपस्थित शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या समन्वयाच्या भूमिकेला समर्थन दर्शवले.