डोंबिवलीमध्ये इमारतीचा अर्धा भाग कोसळला – सुदैवानं जिवितहानी नाही
ठाणे : डोंबिवलीमध्ये आज पहाटे एका धोकादायक इमारतीचा अर्धा भाग कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. जिल्ह्यामध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असून भिवंडीमध्ये जिलानी इमारत कोसळल्यानंतर पुन्हा एकदा इमारत कोसळल्यामुळं हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीच्या कोपर रोडवर असणा-या या दुमजली इमारतीचा अर्धा भाग पहाटेच्या सुमारास कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.
या इमारतीमध्ये एक रहिवासी रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत होता. त्याने इमारतीचा काही भाग कोसळतानाचा आवाज ऐकला आणि सर्वांना सतर्क केले. ही इमारत ४२ वर्ष जुनी असून या इमारतीत १५ रहिवासी राहत होते. या इमारतीचा काही भाग कोसळल्याचं लक्षात येताच इमारतीतील सर्व रहिवाशांनी तात्काळ इमारतीबाहेर धाव घेतली. त्यानंतर इमारतीचा अर्धा भाग कोसळला. सर्वजण बाहेर पडल्यामुळं मोठी दुर्घटना टळली.