वज्रेश्वरी ग्रामपंचायत समोर कोरोना काळात भरला आठवडा बाजार
वज्रेश्वरी: आज सर्व जग कोरोना मुळे त्रस्त आहे आणि देश- विदेशात कोरोनाच्या कहर अजूनही कायम आहे. रिकव्हरी रेट किंवा रुग्ण बरा होण्याचा आकडा जरी वाढला असला तरी त्यामुळे बेसावध न होता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नियमांची केलेली शिथिलता आणि नागरिकांचा बेसावधपणा यामुळे आज युरोपियन देशांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट पुन्हा घोंगावू लागले आहे. कोरोना वर अजूनही लस आलेली नाही अश्या परिस्थितीत कोरोनाचा कहर कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन खबरदारी घेत असताना स्थानिक पातळीवर मात्र उलट चित्र बघायला मिळाले.
वज्रेश्वरीतील मंगळवारच्या आठवडा बाजारात पंचक्रोशीतील नागरिक आपल्या आठवडाभर लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत असतात. वज्रेश्वरी परिसरात भरणार हा एकमेव बाजार असल्या कारणाने दर मंगळवारी बाजारात माणसांची गर्दी होत असते. कोरोना काळात शासनाच्या आदेशानुसार आतापर्यंत हा बाजार बंद होता परंतु आज मात्र वज्रेश्वरी ग्रामपंचायत समोर हा बाजार पुन्हा भरला आणि स्थानिकांनी खरेदीसाठी एकच झुंबड केली. काही अपवाद सोडले तर ना कोणाच्या चेहेऱ्यावर मास्क होता की ना कोणी सोशल डीस्टंसिंग पाळताना दिसत होतं. अगदी बिनधास्त पणे बाजारहाट सुरू होता.
याबाबत विचारणा केली असता व्यापाऱ्यांना थांबण्यात ग्रामपंचायत हतबल झाल्याचे दिसून आले. बाजाराबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करून याबाबत पोलिसांची मदत घेणार असल्याचे वज्रेश्वरी ग्रामपंचायतचे उप सरपंच श्री. अविनाश राऊत यांनी सांगितले. आज आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेवक यांच्या अथक प्रयत्नाने वज्रेश्वरी परिसर पूर्णपणे कोरोना मुक्त झालेला असून ह्या भागात रुग्णसंख्या शून्यावर आणण्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, वज्रेश्वरी यशस्वी झाले आहे. त्यात असल्या बेजबाबदार प्रकारामुळे पुन्हा कोरोना संसर्ग सुरू झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, स्थानिक पोलीस प्रशासन की आरोग्य केंद्राची? मुळात बाजार सुरू करण्यासाठी परवानगी दिलीच कोणी ? ग्रामपंचायत समोर बाजार भरत असताना ग्रामसेवक काय करत होते ? झालेल्या प्रकाराबद्दल सुज्ञ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.