वाड्यातील स्वानंदी सोशल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
वाडा : तालुक्यातील स्वानंदी सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने वाडा येथे आरोग्य सेविका व आशा सेविका यांचा खणा-नारळने ओटी भरून अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या स्वानंदी सोशल वेल्फेअर फाऊंडेशनची एक स्वतंत्र ओळख आहे. या सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबविले जात असतात.
वाड्यातील आरोग्य सेविका व आशा सेविका तसेच गवारी पाड़यातील गरजू महिलांची साडी-चोळी देऊन व खणा नारळाने ओटी भरुन त्यांच्या प्रती वेगळ्या पद्धतीने आदरभाव व्यक्त केल्याने या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.कोरोना महामारी सारख्या कठीण प्रसंगी वाड्यातील आरोग्य सेविका व आशा सेविका या आपले आरोग्य धोक्यात घालून,जिवाची परवा न करता अविरतपणे आपले कर्तव्य पार पाडत होत्या. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची ओटी भरुन सन्मान करण्यात आला. देवळातील देवी त्यांच्या रुपात पाहून कर्तव्यदक्ष महिलांची ओटी भरल्याने त्या साडी चोळीचा योग्य सन्मान होईल या विचार धारेने महिलांची ओटी भरण्यात आली असल्याचे स्वानंदी फाऊंडेशनच्या अध्यक्षा व भाजपच्या नगरसेविका रिमा गंधे यांनी बोलतांना सांगीतले.या कार्यक्रम प्रसंगी स्वानदी सोशल फाऊंडेशनच्या सचीव स्मिता पातकर, उपाध्यक्षा नयना इंगळे, शिवानी आंबवणे, सरिखा आंबेकर आदींसह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.