मी कोणाच्याही दबावाला बळी पडून तक्रार केली नाही :- मुख्याधिकारी अर्चना दिवे
पेण: " मी खासदार, पालकमंत्री किंवा अन्य कोणाच्याही राजकीय दबावाला बळी पडून कोणतीही तक्रार केली नसून माझ्यावर ओढवलेल्या घटनेमुळे तक्रार केली आहे. १६ ऑक्टोबर रोजी पेण नगराध्यक्षा यांच्या दालनात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अनधिकृत बांधकामाच्या मुद्यांवरून संबधिताना नोटीस न बजावल्याने गटनेते यांनी आक्रमक होऊन जो प्रकार केला त्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पेण नरदास चाळ परीसरात २०१८ साली अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. त्यातील सांडपाणी सार्वजनिक ठिकाणी येत होता. याबाबत १२ व १६ ऑक्टोबरच्या मिटिंग मध्येही विषय पटलावर होता. अनधिकृत बांधकामाच्या गटार बांधण्याच्या कामाबाबत जिल्हाधिकारी व शासनाच्या निर्देशनानुसार कारवाई करण्यात येणार होती. सर्व प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर संबधितांना नोटिस काढण्यात येणार होती.
याबाबत मी आमच्या मुख्याधिकारी संघटनेला कळविले आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच मी प्रोसिडिंगमध्ये कोणताही बदल केला नसून मला प्रोसिडिंग वाचून दाखविल्या नंतर आवश्यक तेथे बदल केला आहे. मी कोणाच्याही दबावामुळे तक्रार केली नाही.'असे पेण मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी सांगितले. मुख्याधिकारी यांनी गटनेते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अर्चना दिवे यांची भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली.