वज्रेश्वरी रोडवर डंपर चालकाची चार वाहनांना धडक ; एकाचा मृत्यू
भिवंडी : तालुक्यातील वज्रेश्वरी - अंबाडी रोडवर सोमवारी सकाळच्या सुमारास एका मद्यधुंद डंपर चालकाने भरधाव वेगाने जात असताना सावरोली गावाजवळ एका छोट्या टेम्पोसह इतर तीन वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे.या अपघातात टेम्पोचा चक्काचूर होऊन टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
यशवंत पाटील ( ४५) असे अपघातात मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव असून तो आपल्या टेम्पोतून भाजीपाल्याची वाहतूक करून सकाळी अंबाडीहून वज्रेश्वरीच्या दिशेने निघाला होता.त्यावेळी अंबाडीच्या दिशेला जाणाऱ्या गाडी क्र.MH०४ JK ७५२१ यावरील डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत असताना त्याने समोरून येणाऱ्या या छोट्या टेम्पोला जोरदार धडक दिली.त्यात टेम्पोचा चक्काचूर होऊन टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला.
सदर टेम्पोला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक पळून जात असतांना टेम्पोच्या पाठीमागून येणाऱ्या स्वीफ्ट आणि दुसऱ्या एका टेम्पोला धडक देऊन तेथून अंबाडीच्या दिशेला पलायन करीत असताना झिडके फाटा येथे एका दुचाकीस्वाराला धडक दिली.यावेळी येथील स्थानिक तरुणांनी सदर डम्पर चालक माधव धोंडूबा ठगे (५०) यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर अंबाडी नाका येथील पोलीस चौकीमध्ये परिसरातील शेकडो तरुण व नागरिकांनी जाऊन सदर चालकावर कडक कारवाईची मागणी केली.