कल्याण डोंबिवलीतील आचार्य अत्रे रंगमदिर आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह नाट्यनिर्मात्यांना मुळ भाड्याच्या ७५% सवलत
कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आचार्य अत्रे रंगमदिर आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह नाट्यनिर्मात्यांना मुळ भाड्याच्या ७५% सवलत उपलब्ध करून देण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांनी दिली . सध्या कोरोनामुळे नाट्य व्यावसायीकांची कोलमडलेली आर्थिक परिस्थिती पाहता जागतीक मराठी नाट्यकर्मी निर्माता संघाच्या प्रशांत दामले यांनी केडीएमसी कडे याबाबतची मागणी केली होती.
राज्यातील इतर सर्व नाट्यगृहांप्रमाणेच आचार्य प्र .के .अत्रे रंगमंदिर आणि सावित्रीबाई फुले कलामंदिर ही दोन्ही नाट्यगृहेही २३ मार्च पासून बंद असल्याने नाट्य व्यवसायाला उतरती कळा लागली होती . राज्य शासनाने अटी-शर्तींचे पालन करून ५०% आसन क्षमतेवर नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च , अपुरा प्रेक्षकवर्ग ही बाब लक्षातघेता कोविडचा प्रादुर्भाव असेपर्यंत नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये सवलत मिळण्याची मागणी जागतीक मराठी नाट्यकर्मी निर्माता संघाने केली होती .
त्याप्रमाणे समितीची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये ३१ मार्च २०२१ पर्यतच्या ३०० रुपये तिकीट दरांवर मुळ भाड्यामध्ये ७५% सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.तसेच ज्या नाटकाचे तिकिट दर ३०० रूपयांपेक्षा जास्त असल्यास मात्र विनासवलत नियमित भाडे आकारले जाणार असल्याची माहीती डाॅ . विजय सुर्यवंशी यांनी दिली . तसेच मार्च २०२१ नंतर कोविड साथीच्या अनुषंगाने या सवलतींचा फेरआढावा घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे . तर ही सवलत देताना इतर सेवा-सुविधांचे दर मात्र पुर्वी प्रमाणे लागू राहतील. तसेच ही सवलत फक्त नाट्यनिर्मात्यांसाठी लागू असणार असून सामाजिक संस्था , कंपन्या , क्लब आणि इतर संस्थांना मात्र ते लागू राहणार नसल्याचे शहर अभियंता आणि नाट्यगृह व्यवस्थापन समिती अदयक्ष सपना कोळी देवनपल्ली यांनी दिली आहे