वाड्यात लोखंडाचा गोरख धंदा सुरूच
वाडा: तालुक्यातील अनेक धाब्यांवर ट्रकमधून लोखंडाचे बंडल उतरवून त्याचा धंदा राजरोसपणे सुरुच असून हा धंदा पोलिसांच्या आर्शीवादाने होत असल्याचे बोलले जात आहे.या धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होताना दिसून येत आहे.तालुक्यात लोखंडाच्या उत्पादन करणा-या अनेक कंपन्या असून या कंपनीत तयार होणारा लोखंडाचा माल मुंबई ,ठाणे आदी ठिकाणी जात असतो.सदरचा माल कंटेनर मधून नेला जात असताना कंटेनरचे चालक गाडीतील दोन चार लोखंडाचे बंडल हा व्यवसाय करणा-यांना अल्प किंमतीत देत असतात. भिवंडी वाडा महामार्गावरून दररोज शेकडो वाहने जात असतात. या वाहनांतून अनेक ठिकाणी लोखंड बंडल उतरवून घेतले जातात.त्यानंतर एका रात्री त्याची विल्हेवाट लावली जाते.
विशेषतः हा धंदा रात्रीच्या पोटात केला जातो.लोखंडाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक अथवा बांधकाम व्यावसायिक हा माल घेत असतात. गाडीवाल्यांकडून एका बंडलला दोन ते अडीच हजार रुपये घेतले जातात तर व्यावसायिकांना तीन ते साडेतीन हजार रुपयांना हा माल विकला जातो. एका रात्रीत धंदेवाले लाखोंचा नफा कमवत असल्याने हा धंदा तेजीत आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नारे येथील चारमिनार कंपनीच्या पाठीमागच्या बाजूस लोखंड उतरवाण्याचा धंदा केला जात असल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झाले.त्यानंतर या बाबतच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्याने धंदे वाल्याने आता ही जागा बदलवून आता मुसारणे गावाच्या हद्दीत भिवंडी वाडा रस्त्याच्या कडेला हा गोरख धंदा सुरू केला आहे. भिवंडी - वाडा महामार्गावर अनेक ठिकाणी हा धंदा केला जात असताना पोलिसांना त्याची माहिती नसणे याबद्दल आश्चर्य वाटते.या धंद्याबरोबरच दमणच्या दारूचा धंदाही राजरोसपणे सुरु असून पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.या संदर्भात वाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर संख्ये यांच्याशी संपर्क साधला असता संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.