शेकडोंच्या संख्येने किन्नर होणार पदवीधर पदवी पर्यंत शिक्षण देण्यास सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा पुढाकार
उल्हासनगर : शिक्षणाची इच्छा असूनही काही बंधने किंबहूना अडचणी असल्याने त्यापासुन वंचीत राहणाऱ्या उल्हासनगरातील शेकडो किन्नरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना पडवी पर्यंत शिक्षण देण्यासाठी सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.चांदीबाई महाविद्यालयात किन्नरांचे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी ही घोषणा करण्यात आली.गेल्या काही वर्षांपासून किन्नर समुदायाला ओळखपत्रे बनविणे,बँकेत खाते उघडणे या पासून अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो.हि बाब लक्षात आल्यानंतर वाण्या फाउंडेशन ऑफ उल्हासनगर,किन्नर अस्मिता,इंडस एज्युकेशन या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन हे शिबिर आयोजित केले होते.
या शिबिरात किन्नर समुदायाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे,स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे या विषयीची देखील चर्चा झाली.सिंधू एज्युकेशन सोसायटीने किन्नरांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे तर कोणार्क बँक व इतर बँकांनी देखील किन्नरांना बँक खाते उघडण्यास योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.रोज थोडे थोडे पैसे बचत करून बँकेत जमा करण्यासाठी डेली कलेक्शन करण्यात येईल त्यासाठी किन्नर समुदायातर्फे प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे.या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल. होप या संस्थेने भारतातील पाहिले एलजीटीबी मॅट्रिमोनी सुरू केले असून त्यात सर्वाधिक अर्ज उल्हासनगर मधील किन्नर समुदायाचे असल्याचे मॅट्रिमोनिच्या प्रतिनिधीने सांगितले.यावेळी ऍड मोनिष भाटिया,सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दायमा, ज्योती तायडे,किन्नर अस्मिता संघटनेचे १२५ किन्नर मित्र,नीता काणे,मुजरा नानी,विद्यासागर देडे हे उपस्थित होते.
किन्नर समुदायामध्ये अनेकजण सुशिक्षित आहेत.काहींचे शिक्षण अर्धवट आहे.त्यांची शिक्षणाची तीव्र ईच्छा आहे. या शिबिरात १२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या जवळपास २० किन्नरांचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले असून ते आता पदवीपर्यंत शिक्षण घेणार आहेत.त्याचप्रमाणे १० वी पास व नापास असलेल्या अनेकांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी आमच्या वाण्या संस्थेने घेतली असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा व टीम ओमी कालानी गटाच्या नगरसेविका रेखा ठाकूर यांनी दिली.