ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने बांधला वनराई बंधारा
वासिंद : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे कार्यालय व शहापूर उपविभाग यांच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील ढाकणे येथील कातकरी पाडा येथे नुकताच श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. पाणी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असताना पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, व शहापूर उपविभागातर्फे स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्या सहकार्याने अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व ग्रामस्थ यांनी ढाकणे कातकरीपाडा येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधून या उपक्रमास सुरुवात केली. जिल्ह्यातील इतर भागातही वनराई बंधारे बांधण्याची योजना असून यासाठी ग्रामपंचायतीं पुढाकार घ्यावा असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हिरासिंग भस्मे यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी अभियंता हिरासिंग भस्मे, उपकार्यकारी अभियंता कल्लापा चिवरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत, सरपंच संगिता वाघ, कनिष्ठ अभियंता प्रमिला विशे, कैलास खलाणे, अनिल शेलार, रवी विशे, केतन चौधरी, आदी कर्मचारी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.