वाड्यातील भात खरेदी केंद्रे अद्यापही सुरू नाहीत;शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे ..
वाडा : दिवाळीपुर्वी मोठा गाजावाजा करत आमदार दौलत दरोडा, आमदार सुनील भुसारा व आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत वाडा तालुक्यातील विविध ठिकाणी आधारभूत भात खरेदी केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र गेले अठरा दिवस झाले तरी प्रत्यक्षात आजपर्यंत एकही ठिकाणचे भात खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. ऐन दिवाळीत येथील अनेक शेतकऱ्यांवर मातीमोल भावाने आपले भात व्यापा-यांना देऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या बहुप्रतिक्षित आधारभूत खरेदी केंद्रांचे उद्घाटने ९ नोव्हेंबर रोजी वाडा तालुक्यातील परळी व पोशेरी या दोन ठिकाणी करण्यात आली. यावेळी तालुक्यांत अन्य सात ठिकाणी अशाच प्रकारची भात खरेदी केंद्र उद्यापासून सुरू होतील असे या उद्घाटन प्रसंगी आमदार दौलत दरोडा यांनी सांगितले.मात्र नव्याने दुसरी खरेदी केंद्र सुरू झाली नाहीच, पण प्रत्यक्षात उद्घाटन करण्यात आलेल्या केंद्रांवरच आजपर्यंत खरेदी सुरु करण्यात आलेली नाही.
भात उत्पादक शेतकऱ्यांच्या भाताला आधारभूत केंद्रांवर चांगला दर (१६६८रुपये प्रति क्विंटल) मिळेल व दिवाळी आनंदात साजरा करता येईल या आनंदात येथील शेतकरी वर्ग होता. मात्र प्रत्यक्षात ही खरेदी केंद्र सुरुच झाली नाहीत. शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत आपले भात खाजगी व्यापा-यांना मातीमोल भावाने विक्री करावी लागत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
"दिवाळी पूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून भात खरेदी केंद्राचे उद्घाटन केले.मात्र ती सुरू न केल्याने शेतक-यांना भात विकता आले नाही.आघाडी सरकारचा भोंगळ कारभार सुरु असून प्रशासनावर वचक राहिलेला नाही शेतक-यांवर अन्याय करणारे हे सरकार आहे".
नंदकुमार पाटील,
(जिल्हाअध्यक्ष भाजप पालघर)