चालत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग; ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न
रेल्वे प्रवासात पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कल्याण : कसारा जवळील आठगाव स्टेशन दरम्यान धावत्या लोकलमध्ये दोन तरूण तळीरामांकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आला. इतकेच नाही तर विनयभंग करून या तरुणीला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी साडेदहाच्या सुमारास घडला.प्रसंगावधान दाखवित धर्याने प्रतिकार करीत बचाव केला. पिडित तरुणीनी आपला बचाव करीत कसारा स्थानकात लोकल येई पर्यंत आरोपी तरूणांनाशी प्रतिकार केला.
कसारा येथे राहणारी २१ वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलमध्ये मोठ्या पदावर कामाला आहे. ही तरुणी दररोज कसारा ते ठाणे दरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करते. २५ नोव्हेंबर रोजी रात्री ही तरुणी साडेनऊच्या सुमारास ठाण्याहून लोकल ट्रेनच्या महिला डब्यात बसली. या डब्यात अन्य प्रवासी महिला होत्या. ही ट्रेन आठगाव स्थानक गाठेर्पयत रिकामी झाली होती. डब्यात केवळ ही तरुणी एकटीच होती. आठगाव स्थानकात हि लोकल ट्रेन सोडत असतांना दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत धुंद होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती. तिने लगेच तिच्या मोबाईलवर दोघांचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले.दरम्यान या दोघांनी तरुणीचा विनयभंग केला. तरुणी शेवटर्पयत प्रतिकार करीत होती. या झटापटीत तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याच प्रयत्न झाला. तोपर्यत लोकल ट्रेन कसारा स्थानकात पोहचली होती. आरोपी पैकी एक तरुण चालत्या लोकल ट्रेन मधुन उतरत पसार झाला. मात्र दुसऱ्या आरोपी तरूणांस कसारा स्थानकात पिडीत तरुणीचा नातेवाईक जो कसारा स्थानकात येऊन थांबला होता. त्याने व रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले. तर दुसऱ्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली.
आरोपी अमोल जाधव आणि अमन हिले हे दोघे ठाण्याला एका कंपनीत कामाला आहेत. वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी सांगितले की, या दोन्ही आरोपींच्या विरोधात ३०७, ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांनी घाबरण्याची गरज नाही. एखाद्या लोकल ट्रेनच्या महिल्या डब्यात कोणी नसेल तर त्यांनी पुरुषांच्या डब्यातून प्रवास केला पाहिजे. आम्ही सर्व ठिकाणी गस्त वाढविली आहे. या दोघांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरु आहे. पुढील तपास गुन्हे निरिक्षक योगेश देवरे करीत आहे.