येत्या १ डिसेंबर पासून एफ केबिन रोड वाहतुकीसाठी खुला;नागरिकांना मिळणार दिलासा
कल्याण : कल्याण पूर्वेतील एफ केबिन रोड वाहतुकीसाठी खुला होणार असून या रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून या कामाची पाहाणी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केली. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे एमएमआरडीएच्या निधीतून कल्याण(पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्व. आनंद दिघे साहेब उड्डाणपूल (एफ कॅबिन ब्रिज) पर्यंत काँक्रीट रस्ता तयार करणेचे काम हाती घेतले होते. हा रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सेवा वाहिन्यांकरीता रस्त्याच्या कडेने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
एफ कॅबिन ब्रिज येथे वारंवार खड्डे पडत असल्याने महापालिकेच्या रस्ते दुरुस्ती निधीमधून उड्डाण पुलावर मास्टीक अस्फाल्टचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच सदर ब्रिजवर एक्स्पांशन जॉइंट तुटलेले असल्याने तातडीने दरपत्रके मागवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. सदर एक्स्पांशन जॉइंटचे काम पुर्ण झालेले असून क्युरींग करीता ३० नोव्हेंबरपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून तद्नंतर वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.
वाहतूक विभागाने ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सदर रस्ता बंद ठेवण्याची परवानगी दिली होती. परंतू महापालिकेने यापुर्वीच वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचे काम पुर्ण केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज या कामाची पाहणी केली असून कामाबाबत शहर अभियंता सपना कोळी(देवनपल्ली) व अभियांत्रिकी विभागाची प्रशंसा करत उपयुक्त सुचना केल्या आहेत.