मुरबाडचा बागेश्वरी सजणार; ब्रिटिशकालीन तलावाला पर्यटनाचा दर्जा ..
मुरबाड : शहराजवळ वन विभाग व मुरबाड नगर पंचायतीच्या वतीने एक पर्यटन स्थळ विकसित होत असून लोकांना जलक्रीडा करण्या बरोबरच उंच टेकडीवर शुद्ध हवेचा मुबलक पुरवठा करणाऱ्या ऑक्सीजन पार्क मध्ये मुक्त पणे विहार करण्याची संधी मिळणार आहे त्याच बरोबर गर्द झाडीत असलेल्या पुरातन बागेश्र्वरि मंदिरात देवीचे दर्शन घेण्याची संधी मिळणारआहे केवळ मुरबाड शहर नव्हे तर कल्याण -मुंबईहून तालुक्यात येणाऱ्या अनेक पर्यटकांचे ते आकर्षणाचे केंद्र असणार आहे.
मुरबाड शहराला पाणी पुरवठा करणारा ब्रिटिश कालीन बागेश्वरी तलाव व त्याशेजारी असलेली उंच टेकडीवर पर्यटन स्थळ विकसित होत आहे. त्यापैकी ऑक्सीजन पार्कचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. त्यासाठी आतापर्यंत १ कोटीच्या आसपास निधी खर्च झाला आहे. पुढील महिन्यात बागेश्र्वरी तलावात बोटींग सूरु होत असून ही संधी पर्यटकांटाना मिळणार आहे. त्यासाठी तलावाचे खोलीकरण व सुशोभीकरण करणेसाठी मुरबाड नगर पंचायतीला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार किसन कथोरे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळाले आहे.
मुरबाड शहरापासून दीड किमीवर वन विभागाने एक उद्यान तयार केले आहे. या उद्याना लगतच ब्रिटिश काळात बांधलेला बागेश्वरी तलाव आहे. या तलावाच्या चारही बाजूला असणाऱ्या मोठया झाडांमुळे अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. बागेश्वरी तलाव परिसरात सुशोभीकरणासाठी तसेच तलावातील गाळ काढणे, पाणी गळती होऊ नये म्हणून बांधाला पिचींग करणे, कुंपण, पायवाटा बांधणे, सोलार लाईट, स्वच्छता गृह, संरक्षक भिंती बांधणे. ही कामे मुरबाड नगरपंचायतीच्या माध्यमातून केली जाणार आहेत. त्याचबरोबर वन विभागा मार्फत स्थानिक तरुणांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात येणार आहे.
संयुक्त वनव्यवस्थापन समिती वेहरे मार्फत बोट चालविण्यात येणार आहेत. चार आसनांची २ पायडल बोट व १ दहा आसनांची मोटार बोट अशा दोन्ही प्रकारच्या बोटी खरेदी करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. त्याचबरोबर तलावाच्या काठावर दोन टॉवर उभे करून झिप रोप वे तयार करण्यात येणार आहे.तलावातील पाणी कमी झाले तर अडचण येऊ नये. म्हणून तरंगती जेट्टी बांधण्यात येणार आहे. फुग्यामध्ये उभे राहून तलावातील पाण्यात तरंगणाऱ्या झोर्बिंग zorbing बॉलची सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
"आतापर्यंत 1 कोटी खर्च करून बागेश्वरी ऑक्सीजन पार्क पासून तलावा पर्यंत उतरण्यास रस्ता, तसेच इतर अनुषंगिक कामे करून पुरातन काळा पासून नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर काही काळापासून उजाड झाला होता. तो अधिक खुलविण्याचा प्रयत्न केला आहे."
- विकास भामरे, वनक्षेत्रपाल(पूर्व), मुरबाड.