ठाण्यात गुटखा बंदी कागदावरच;औषध प्रशासनाचे दुर्लक्ष.
ठाणे : राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर आणि उत्पादनावर बंदी आहे. मात्र, तरीही ठाणे जिल्ह्यात सहजतेने गुटखा ग्राहकांना उपलब्ध होतो. गुजरात राज्यात उत्पादन केलेला गुटखा सिल्वासा मार्गे ठाण्याच्या भिवंडी परिसरात येतो आणि जिल्हाभर वितरित करण्यात येतो. अन्न व औषधी प्रशासनाने जानेवारी ते १५ नोव्हेंबर पर्यंत १२ कोटी २२ लाख ४१ हजाराचा गुटखा जप्त करीत ४७ दुकाने सील करण्याची धडक कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिल्वासा मार्गे ठाणे जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गुटख्याच्या विविध कंपन्यांच्या ब्रँडचे वितरण हे अवघ्या ठाणे जिल्ह्यासह मुंबई परिसरातही करण्यात येते.ठाण्याच्या कळवा, मुंब्रा, कौसा, रशीद कंपाउंड, शीळ डायघर, कापूरबावडी, महागिरी, कासारवडवली, वागळे इस्टेट, इंदिरानगर, अंबिकानगर अशा जवळपास शहरातील ८० टक्के पानाच्या टपऱ्यांवर विविध प्रकारचा गुटखा सहज मिळतो. गुजरात राज्यातील सिल्वासा मार्गे भिवंडीत येतो गुटखा
महाराष्ट्रात बंदी असल्याने गुटख्याची मोठी मागणी असलेल्या गुटख्याचे उत्पादन गुजरात राज्यात करण्यात येते. सदर उत्पादित माल हा महाराष्ट्रात चोरट्या वाहतुकीद्वारे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात येतो. त्यांनतर या गुटख्याची वाहतूक जिल्हांतर्गत चोरट्या वाहतुकीने करीत पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमध्ये पोचविण्यात येते. बंदीमुळे गुटखा हा दामदुप्पट भावाने विकला जातो. तरीही गुटख्याची विक्रमी विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. येणाऱ्या तक्रारी यावरून प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत असलायची माहिती आहे.
१२ कोटी २२ लाख ४१ हजाराचा गुटखा जप्त
अन्न व औषधी प्रश्नाच्या विविध पथकाने केलेल्या ठाणे जिल्ह्यातील कारवाईत पथकाने जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल १२ कोटी २२ लाख ४१ हजाराचा अवैध गुटखा जप्त करून तो नष्ट करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात ६३ याठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये जप्त केलेला सहा कोटी रुपयांचा गुटखा नष्ट केल्याचा दावा अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.