"निसर्ग मित्र बंधारा" पोर्टेबल फोल्डिंगचा अनोखा बंधारा विकसित

 बदलापूर :  पावसाळ्यानंतर वाहणारे पाणी अडवून ते जास्तीत जास्त जमिनीत जिरविण्यासाठी बदलापूर जवळील बेंडशिळ या गावातील ओढ्यावर फोल्डिंगचा पोर्टेबल असा बंधारा विकसित करण्यात आला असून तो खऱ्या अर्थाने "निसर्गमित्र" बंधारा ठरत आहे. कृषिभूषण राजेंद्र भट यांनी हा बंधारा विकसित केला आहे. भट यांनी  जल संचयनासाठी ‘निसर्गमित्र' बंधाऱ्यांची साखळी तयार केली असून त्यामुळे बेंडशीळच्या ओढ्यात लाखो लिटर पाणी साठून ते जमिनीत जिरवले जात आहे.पावसाळ्यानंतर वाहून जाणारे ओढ्या-नाल्यांचे पाणी अडविण्यासाठी उभारण्यात येणारे  बंधारे  हे तीन ते सहा महिने उभारायचे असल्याने तितक्या काळापुरते प्रवाहात बांध घालून पुन्हा काढून ठेवता येतील, अशा पोर्टेबल फोल्डिंगच्या बंधाऱ्यांचा यशस्वी प्रयोग अंबरनाथ तालुक्यातील बेंडशीळ येथील ओढ्यावर करण्यात आला आहे.

बेंडशीळ गावाबाहेरून वाहणाऱ्या या ओढ्यावर प्रयोगशील शेतकरी कृषिभूषण राजेंद्र भट यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी एक बंधारा बांधला आहे. त्याच ओढ्यावर आता आणखी ‘निसर्गमित्र' नामक नवे दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राजेंद्र भट यांनी स्वखर्चाने हा निसर्गमित्र  बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यांमुळे राजेंद्र भट यांच्या बरोबरच त्यांच्या शेजारील शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला आहे.साधारण दिवाळीनंतर ओढ्यात हा बंधारा उभारला जातो आणि ओढ्यातले पाणी संपले की काढून ठेवला जातो. या पोर्टेबल फोल्डिंगच्या बंधाऱ्यामुळे ओढ्यात काँक्रिटची भिंत अथवा लोखंडी दरवाजा कायमस्वरूपी राहत नाही. परिणामी ओढ्यातील जलचरांना ते अडथळा ठरत नाहीत. पावसाळ्यात ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले की त्या पाण्यावर चढून वळगणीचे मासे उथळ पाण्यात येतात. उंच बंधाऱ्यांमुळे या माशांचा मार्ग रोखला जातो. बंधाऱ्याच्या भिंतीमुळे ओढयाचे पात्र विस्तारते. त्यामुळे काठावरील जमिनीची धूप होते. शेतीचेही नुकसान होण्याचा धोका असतो. काँक्रिटच्या भिंतीमुळे  पाण्याबरोबरच गाळही साचतो. पोर्टेबल फोल्डिंगच्या बंधाऱ्यांमुळे हे सर्व धोके टळतात. म्हणूनच या बंधाऱ्याला "निसर्गमित्र बंधारा" म्हटले जाते.


आपण जमिनीतून पाणी घेतो परंतु जमिनीत पाणी पुन्हा भरत नाही. जसे आपण बँकेत आपल्या खात्यात पैसे असले तरच काढतो आणि पैसे काढले कि पुन्हा भरतो त्याप्रमाणेच जर आपण जमीनीतुन पाणी काढले तर जमिनीत पाणी साठवण्याची जबाबदारीही आपलीच आहे. याच भावनेमधून आमच्या शेता जवळून वाहणाऱ्या ओढ्यातून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न करतो असे राजेंद्र भट यांनी सांगितले. ओढ्यामध्ये जमिनीत काँक्रीटची भिंत बांधून त्यात एल आकाराचे चॅनल बसवले जातात. या चॅनलवर नटबोल्टच्या साहाय्याने लोखंडी प्लेट उभारता येतात. या उभ्या दोन प्लेटच्या मध्ये रबरी पट्टी बसविण्यात येते जेणे करून दोन प्लेट मधून पाणी वाहून जात नाही. पावसाळा संपला कि या चॅनल मध्ये प्लेट उभारण्यात येतात. आणि उन्हाळ्याच्या दरम्यान ज्यावेळी ओढ्यातील पाणी संपत येते त्यावेळी म्हणजे पावसाळा सुरु होण्यापूर्वी या प्लेट काढून टाकण्यात येतात. या निसर्गमित्र बंधाऱ्याला  सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो. अर्थात ओढ्याची रुंदी कमी अधिक होईल त्या प्रमाणात खर्चही कमी अधिक होऊ शकतो. 


निसर्गमित्र बंधाऱ्यामुळे भूजल पातळी वाढून कुपनलिका, विहीरींचा पाणीसाठा वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू लागले आहे. पोर्टेबल फोल्डिंगच्या बंधाऱ्यांमुळे आता पाणी अडविणे अधिक सोपे होणार आहे.  बेंडशिळ जवळील या ओढ्यावर आता तीन बंधारे उभारण्यात आले आहेत. तिसरा बंधारा यशस्वी झाला आहे. यामुळे लाखो लिटर पाणी अडविण्यात यश मिळाले आहे. या तिसऱ्या बंधाऱ्यावरून जर पाणी वाहू लागले तर दुसऱ्या बंधाऱ्याला पंप लावून त्यातील पाणी पहिल्या बंधाऱ्यात सोडण्यात येणार आहे. परिणामी पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होईल.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...