उल्हासनगरातील मोटरसायकल चोरीचे कनेक्शन जुन्नर मध्ये...
दोन सराईत चोरांकडून १०मोटरसायकली ताब्यात,मध्यवर्ती पोलिसांची कामगिरी
उल्हासनगर :उल्हासनगरातून चोरलेली मोटरसायकल ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये विकली.या कनेक्शन वरून मध्यवर्ती पोलिसांनी दोन सराईत चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून १०मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.पोलिसांना या कामगिरीची शाबासकी देणारे नवनियुक्त पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी सहायक पोलीस आयुक्त डी.डी.टेळे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर,पोलीस निरीक्षक(गुन्हे)राजेंद्र कोते, सहायक पोलीस निरीक्षक अस्लम खतीब उपस्थित होते.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन चोरी झालेली एक युनिकोर्न मोटारसायकल ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे विकण्यात आल्याची माहिती बातमीदाराकरवी सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खतीब यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी मूळ जुन्नरचा असणाऱ्या व उल्हासनगरातील शांतीनगरात राहणाऱ्या महादू आढारी याला अटक केली.धिरज शिंदे व आणखीन एकासोबत मोटरसायकली चोरी केल्याची कबुली महादूने दिल्यावर पोलिसांनी संजयला देखील अटक करण्यात आली.
आरोपींनी अंबरनाथ,उल्हासनगर आणि कल्याण शहरांमधून ७ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या एकूण 10 मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून ह्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर करीत आहेत.